एकादशी सोहळ्यास १० लाख भाविकांची उपस्थिती

लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरी नगरीत एकादशी सोहळ्यासाठी १० लाख भाविक दाखल झाले आहेत. चंद्रभागा नदीत पवित्र स्नान ,नगरप्रदक्षिणा आणि सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी दिसून आली. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन रांग ६ कि.मी. दूर गेली असून भाविकांना दर्शनासाठी १७ ते १८ तास लागत आहेत. टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघे गर्जे पंढरपूर या अभंगा प्रमाणे येथील वातावरण भक्तिमय झाले आहे.

माझे माहेर पंढरी..आहे भिवरेच्या तीरी.. या अभंगा प्रमाणे दरवर्षी न चुकता वारीला भाविक येतात. जवळपास २० दिवस पायी चालत येत सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यास भाविक आसुसलेला होता. एकादशी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून जवळपास १० लाख भाविक या सोहळ्याचे साक्षीदार झाले आहेत. सर्व संतांच्या पालख्या सोमवारी रात्री त्यांच्या मठात विसावल्या. त्यानंतर एकादशीला पहाटे अडीच पासून भाविक चंद्रभागा नदीकडे जाऊ लागले. दरम्यान, सकाळी साडेसहाच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह सर्व मानाच्या पादुका चंद्रभागा स्नानासाठी आल्या होत्या.चंद्रभागा नदीत स्नान उरकून नगरप्रदक्षिणा केली जाते आणि त्यानंतर विठ्ठलाचे किवा मंदिराच्या कळसाचे दर्शन घेण्याची वारकरी सांप्रदायात परंपरा आहे.

चंद्रभागा नदीत पुरेसे पाणी असल्याने भाविकांनी स्नानाचा आनंद घेतला. यावर्षी नदीपात्रात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून २० जीवरक्षक  तनात केले होते. चंद्रभागा नदीच्या पलतीरावरील ६५ एकर जागा भाविकांनी फुलून गेली. याठिकाणी भाविकांना मोफत राहण्याची,पिण्याच्या पाण्याची,शौचालय,वैद्यकीय मदत आदी सुविधा प्रशासनाकडून मोफत पुरवल्या जातात. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शहरात प्रमुख रस्ते आणि मंदिर परिसरात पालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न झाले. मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेत भाविकांना मोफत चहा,पाण्याची व्यवस्था केली होती. ज्या भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही, अशा भाविकांनी खासगीवाले यांच्या रथाचे दर्शन घेतले. या रथामध्ये राही रखुमाईची मूर्ती ठेवली जाते.तर हा रथ ओढण्यासाठी १२ बलुतेदारांचा मान असतो.

एकंदरीत प्रशासनाने शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण केलेल्या कामामुळे भाविकांची गरसोय झाली नाही. मात्र स्टेशनरोड येथे अनेक ठिकाणी अतिक्रमणे काढण्यात पालिकेला अपयश आले. असे असले तरी लाडक्या विठूरायचे लोभस रूप डोळ्यात साठवून आणि त्याच्या दर्शनाने भाविक तृप्त झाले आहेत.