पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पायी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या व इतर अनेक संतांच्या पालख्यांचा दळभार सोलापूर जिल्ह्य़ात आला आहे. पंढरपूरही समीप आल्याने वारक ऱ्यांना विठ्ठलाच्या भेटीसाठीची ओढ वाढली आहे. सर्व संतांच्या पालख्यांमुळे अवघ्या सोलाापूर जिल्ह्य़ात भक्तिमय वातावरण दिसून येते. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे दुपारी माळशिरस तालुक्यातील पुरुंदावडे येथे जिल्ह्य़ातील पहिले गोल रिंगण झाले. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा अकलूज येथील गोल रिंगण सोहळा पाहून लक्षावधी भाविकांच्या नेत्रांचे पारणे फिटले.

काल बुधवारी माउलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्य़ातून सोलापूर जिल्ह्य़ात धर्मपुरी येथे आगमन झाल्यानंतर सायंकाळी पालखीचा मुक्काम नातेपुते येथे होता. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास नातेपुते येथून हा पालखी सोहळा पुरुंदावडे येथे पोहोचला. तर जगद्गुरू संत तुकोबांचा पालखी सोहळा सराटी येथून इंदापूर तालुक्याची शीव ओलांडून सोलापूर जिल्ह्य़ात अकलूज येथे दाखल झाला. या वेळी अकलूजकरांनी आपल्या परंपरेला साजेशा स्वरूपात पालखीचे भव्य स्वागत केले.

संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा पुरुंदावडे येथे दुपारी दाखल झाल्यानंतर तेथे ठरल्याप्रमाणे गोल रिंगणाची तयारी अगोदरच झाली होती. सोलापूर जिल्ह्य़ातील माउलींचे हे पहिलेच रिंगण होते. रिंगण तयार केल्यानंतर रिंगण पाहण्याचा क्षण समीप आला होता. त्यामुळे प्रत्येकाची उत्सुकता ताणली गेली होती. अगोदर मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. माउलींच्या पादुकांचेही पूजन झाले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे अखेर पालखीचे चोपदार राजाभाऊ रंदवे यांनी इशारा करताच माउलींचे अश्व धावत सुटले. हातात भागवत धर्माची पतका घेऊन अश्वावर आरूढ झालेल्या मानकऱ्याने रिंगण पूर्ण केल्यानंतर वारकरी व भाविकांनी अश्व धावून गेलेल्या जागेवरील माती सश्रद्ध भावनेने माथ्याला लावून धन्यता मानली. उंच उडय़ा मारत, फुगडय़ा खेळत आनंद लुटण्याची पर्वणी काही वेगळीच होती. टाळ-मृदुंगांच्या तालावर झालेला हा रिंगण सोहळा अनुभवताना शहरी भागातील नागरिकांनीही  आनंद मनात साठवून ठेवला. या वेळी पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात तैनात होता.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी येथून इंदापूर तालुक्याची सीमा पार करीत सोलापूर जिल्ह्य़ात अकलूज येथे दाखल होताच पालकमंत्री विजय देशमुख यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह माळशिरसचे आमदार हणमंत डोळस, माळशिरस तालुका पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. एस. वीरेश प्रभू आदी उपस्थित होते. हा पालखी सोहळा अकलूजच्या गांधी चौकात पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांच्या पत्नी नंदिनीदेवी मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील आदींनी पालखीचे स्वागत केले. नंतर अकलूज ग्रामप्रदक्षिणा करून सदाशिवराव माने प्रशालेच्या प्रांगणावर पालखीचे आगमन झाले. पालखीचे सारथ्य पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले. रिंगण सोहळा सर्वाना समाधानाने पाहता यावा, यासाठी अकलूज ग्रामपंचायतीने नेटके नियोजन केले होते. रिंगण सोहळा पाहण्यासाठी दोन तास अगोदरपासून भाविकांची गर्दी उसळली होती. पालखी सोहळा रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी दाखल होताच संत ज्ञानोबा व तुकोबांच्या जयजयकाराने अवघे आसमंत दुमदुमून गेले होते. तत्पूर्वी, संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. मानाच्या अश्वाचे पूजन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी केले. गोल रिंगणाच्या ठिकाणी गोलाकार सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती. अश्वस्वाराने इशारा देताच अश्व दौडत निघाले. त्यापाठोपाठ समस्त पताकाधारी, वीणेकरी, टाळकरी, मृदंगधारी व माथ्यावर वृंदावन घेतलेल्या महिला धावल्या. अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झालेले गोल रिंगण संपताच श्रद्धाळू भाविकांनी अश्व धावताना त्याची लागलेली पायधूळ माथ्यावर लावण्यासाठी गर्दी केली होती.