संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूच्या इनामदारवाड्यातून प्रस्थान झाले. देहूरोड येथून पालखी आज निगडीच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि पिंपरी चिंचवड उद्योग नगरी संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्ती-शक्ती चौकात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने या पालखीचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. दिंडी प्रमुखांना महापालिकेकडून ताडपत्रीही भेट देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड उद्योग नगरीत आज संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या पालखीचे टाळ-मृदुंगाच्या गजरात आगमन झाले. यावेळी सगळेच वारकरी तुकाराम महाराजांच्या नामघोषात तल्लीन झालेले बघायला मिळाले. महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रवण हर्डीकर हे पालखीच्या स्वागतासाठी हजर होते. यावेळी विविध संस्थांतर्फे पाणी, अन्न आणि फळांचे वाटप करण्यात केले.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज आकुर्डीतल्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरात होणार आहे. निगडीकरांनीही पालखीचे स्वागत केले. ४ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी पालखीचे प्रस्थान झाले आहे. वारी हा एक आनंद सोहळा असतो. या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी तहान-भूक विसरून विठ्ठलाच्या पायाशी जाण्यासाठी मार्गस्थ होतात. आता पुढचे अनेक दिवस हा असाच उत्साह बघायला मिळणार आहे.