News Flash

साडेतीन वर्षांत महामार्गावर ३८० अपघात

महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने चालविली जात असल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता आहे.

३३५ जखमी, तर ५७ जणांचा बळी

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : वसई पूर्वेतून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव वेगाने वाहने चालविणे, वाहनांवरील नियंत्रण सुटणे, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतात. मागील साडेतीन वर्षांत महामार्गावर ३८० अपघाताच्या घटना घडल्या असून यात ३३५ जण जखमी झाले आहेत तर ५७ जणांचा बळी गेला आहे.

वसई पूर्वेतील भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग गेला आहे. मुंबई व गुजरातसह इतर भागांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. त्यामुळे येथून दररोज मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असते. परंतु या वर्दळीच्या मार्गावर विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असल्याने याचा फटका हा सर्वसामान्य वाहनचालकांना बसतो. महामार्गावर झालेली अतिक्रमणे, सेवा रस्त्याचा अभाव, वाहने मध्येच उभी केली जात असल्याने अरुंद झालेले मार्ग, महामार्गाच्या कडेला होत असलेला चिखल, मोकाट जनावरांचा वावर यांसह अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे  सर्वाधिक अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.

वसई पूर्वेतील विरार ते दहिसर टोलनाका अशी चिंचोटी महामार्ग पोलिसांची हद्द आहे. या हद्दीत या महामार्गावर चिंचोटी पुलाजवळील साधना हॉटेल, बापाणे फाटा, दुर्गामाता मंदिर, गोल्डन तुलीप हॉटेल, बर्मा सेल, सायली पेट्रोल पंप, वंगणपाडा, वासमाऱ्या पूल, एचपी पेट्रोल पंप, रॉयल गार्डनजवळ, किनारा हॉटेल ससूनवघर, घोडबंदर खिंड, पाली दिल्ली दरबार हॉटेल ही १३ ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या ठिकाणीही अपघाताच्या घटना घडत असतात. विशेषत: भरधाव वेगाने वाहने चालविणे व नियंत्रण सुटणे यामुळे सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मागील साडेतीन वर्षांत महामार्गावर विरार ते दहिसर टोलनाका या दरम्यान साडेतीन वर्षांत ३८० अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात ५७ जणांचा बळी गेला आहे तर ३३५ जण जखमी झाले असल्याची महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

बेफाम वेगाला महामार्ग पोलिसांकडून आवर

महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने चालविली जात असल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता आहे. या वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी वाहतूक विभागाने मागील काही वर्षांपासून स्पीडो मीटर यंत्राद्वारे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ८० किलो मीटरहून अधिक वेगाने जाणाऱ्या वाहनांचे स्पीडो मीटर यंत्रणेद्वारे फोटो घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. २०१७ पासून ते आतापर्यंत १ हजार २५४ अति वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, विना हेल्मेट, विना सीटबेल्ट, अतिरिक्त मालाची वाहतूक, विनापरवाना प्रवास नियमांचे उल्लंघन करतात. चालू वर्षांत अशा १२ हजार ५३४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महामार्गावरील अपघाताच्या घटना रोखण्यासाठी महामार्ग वाहतूक विभागाकडून वाहनचालकांचे प्रबोधन, अनधिकृत दुभाजक बंद करणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई, दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती यासह इतर उपाययोजना केल्या जात आहे. येत्या काळात महामार्गवरील अपघाताचे प्रमाण हे आणखीन कमी कसे करता येईल यासाठी विशेष पावले उचलली जात आहेत.

– विठ्ठल चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस चिंचोटी विभाग

साडेतीन वर्षांतील अपघात

वर्ष           अपघात        जखमी       मृत्यू

२०१८          १५३           १४१            २०

२०१९          ८८             ७०             २०

२०२०         १०२            ९६             १२

२०२१        ३७              २८              ०५

(जूनपर्यंत)

एकूण     ३८०           ३३५               ५७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 10:56 am

Web Title: 380 accidents on mumbai ahmedabad highway in three and a half years zws 70
Next Stories
1 वाहनातील जीपीएस प्रणालीमुळे हत्येचा उलगडा
2 लस घेतली नसतानाही नागरिकांना प्रमाणपत्र
3 वसई शहरासाठी जून महिना दिलासादायक
Just Now!
X