News Flash

वसई-विरारमधील सर्व आठवडी बाजार बंद

मागील महिनाभरापूर्वी करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आठवडी बाजार खुले ठेवण्यास मोकळीक मिळाली होती

वसई-विरार महापालिकेचे आदेश

वसई : वसई-विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात भरणाऱ्या आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे  शहरात पुन्हा करोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वसई-विरार शहरातील सर्वच आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त गंगाथरन डी.यांनी दिले आहेत.

वसई-विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात आठवडे बाजार भरविले जातात. या बाजारात विविध ठिकाणाहून फेरीवाले विक्री करण्यासाठी येत असल्याने ग्राहकांची वस्तू खरेदीसाठी  गर्दी होत असते. मागील महिनाभरापूर्वी करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आठवडी बाजार खुले ठेवण्यास मोकळीक मिळाली होती. मात्र मोकळीक मिळताच आठवडी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी जमत असल्याचे चित्र दिसून आले आहे. एका आठवडी बाजारात साधारणपणे हजारोच्या संख्येने नागरिक एकत्र येत आहेत. यात काही नागरिक मुखपट्टीविना फिरतात, तर दुसरीकडे सामाजिक अंतराचे नियमही पाळले जात नाहीत. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होण्याची शक्यता आहे.

सध्या वसई विरार हे ३ स्तरात आहेत. मागील तीन-चार दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्याचा सकारात्मक लागण दर ही वाढला होता यामुळे पालघर जिल्हा चौथ्या स्तरात जाण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे चिंता अधिकच वाढली होती. परंतु आठवडी बाजारात होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमुळेही करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने महापालिकेने ३० जूनपासून शहरात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार असल्याचेही पालिकेने काढलेल्या आदेशपत्रकात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 11:04 am

Web Title: all week market closed in vasai virar zws 70
Next Stories
1 टंचाईमुळे लसीकरण संथगतीने
2 साडेतीन वर्षांत महामार्गावर ३८० अपघात
3 वाहनातील जीपीएस प्रणालीमुळे हत्येचा उलगडा