भर पावसात कामे सुरू असल्याने गुणवत्तेचा प्रश्न; १३ कोटी रुपये खर्च निर्धारित

भाईंदर : भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील जागेत पालिका प्रशासनाकडून कोटय़वधी रुपये खर्च करून सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र हे काम चक्क भर पावसात करण्यात येत असल्यामुळे कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न उभा राहिला आहे तर प्रशासनदेखील या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसराचा विकास व्हावा याकरिता दोन वर्षांपूर्वी मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून निविदा काढण्यात आली होती. याकरिता प्रशासनाकडून १३ कोटी रुपये खर्च निर्धारित करण्यात आले. त्यानुसार भाईंदर पश्चिम भागात ८ कोटी रुपये आणि पूर्व भागात उर्वरित रक्कम खर्च करण्यात येत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना प्रवास करणे कठीण होत असून वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वारंवार हे काम सतत वादाच्या भोवऱ्यात आढळून येत आहे.

अशा परिस्थितीत शनिवारीदेखील भर पावसात हे काम करण्यात येत असल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे मुसळधार पाऊस कोसळत असताना सिमेंट भरणीचे काम करण्यात आल्याने कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न उभा राहिला आहे. तर अशा पद्धतीने काम करण्यात आल्याने काही वर्षांने पुन्हा यांच्या दुरुस्तीकरिता लाखो रुपये खर्च करावे लागणार अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून देण्यात येत आहे.

प्रशासनाकडून १३ कोटी रुपये खर्च निर्धारित करण्यात आले. त्यानुसार भाईंदर पश्चिम भागात ८ कोटी रुपये आणि पूर्व भागात उर्वरित रक्कम खर्च करण्यात येत आहे.

रेल्वे स्थानकाबाहेर होणारे काम हे प्रगतिपथावर सुरू आहे. त्यामुळे पावसात काम करण्यात येत असल्याची तक्रार अद्यापही प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. मात्र त्या कामात काही हलगर्जीपणा करण्यात येत असला तर कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग)