तौक्ते वादळ व पावसाचा परिणाम

वसई: वसईच्या पूर्वेतील ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाच्या सुरुवातीला धूळवाफ्याची पेरणी केली जाते. तौक्ते चक्रीवादळ व अधूनमधून पडणारा अवकाळी पावसाच्या परिणामामुळे धूळवाफ्याच्या भात पेरणीची शक्यता धूसर झाली आहे. यामुळे आता चिखलावरील जमिनीवरच पेरणी करावी लागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

वसईत मोठय़ा प्रमाणात भात पीक घेतले जाते. काही भागातील शेतकरी भाताची पेरणी ही तापलेल्या जमिनीची नांगरणी करून रिमझिम पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन सुक्या धुळीच्या शेतात धूळवाफ्याची पेरणी करतात. कारण धूळवाफ्याच्या पेरणीची भातरोपे थोडासा पाऊस झाला तरी लागलीच तयार होत असल्याने त्यामध्ये तणाचे प्रमाण खूप कमी होऊन तण वाढण्या अगोदर भाताची रोपे मोठी उभारी घेतात. म्हणून ही धूळवाफ्याच्या पेरणीवर काही शेतकऱ्यांचा भर असतो. परंतु यंदाच्या वर्षी तौक्ते चक्रीवादळ व अवकाळी पाऊस यामुळे जमिनीत मोठय़ा प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. त्यातच आता पूर्वमोसमी पाऊसही अधूनमधून कोसळू लागला आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने जमीनही आता लवकर सुकणार नाही. त्यामुळे धूळवाफ्याची पेरणी करणे जवळपास अशक्य झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. असे जरी असले तरी आता शेतजमिनीच्या ओलाव्यात पेरणी करून भाताला मोड आणून करण्यात येणारी पेरणी हा पर्याय उपलब्ध आहे.

यंदा शेतकऱ्यांना धूळवाफ्याची पेरणी करणे शक्य नसले तरी आधुनिक शेती कसण्याचा पद्धतीतील एस.आर. टी., ड्रमसीडर या पद्धतीने भात लागवड करणे शक्य आहे. तर मॅट पद्धतीने देखील रोपवाटिका तयार करणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वरील पद्धतींचा वापर करून भात पेरणी करू शकतात.

– अनिल मोरे, वसई तालुका सहाय्यक कृषी अधिकारी