तांत्रिक घोळामुळे वसईकर त्रस्त

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई: गेल्या काही दिवसांसून लस मिळत नसल्याने वसईकर हवालदिल झाले आहेत. अनेकांना चुकीची प्रमाणपत्रे मिळत आहेत तर आता लस घेतली नाही तरी लस घेतल्याचे प्रमाणपत्रे मिळू लागली आहेत. पालिकेने मात्र या तांत्रिक चुका असल्याचे सांगितले आहे.

करोना लसीकरणाला राज्यात १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. लसीकरण मोहीम सुरू होऊन सव्वा चार महिने उलटले तरी वसई विरार शहरात जेमतेम १० टक्के जणांचे लसीकरण झाले आहे. करोनाची दुसरी लाट जरी कमी झाली असली तरी तिसऱ्या संभाव्य लाटेपासून संरक्षण म्हणून करोना प्रतिबंधात्मक लस आवश्यक बनली आहे. परंतु वसई विरार शहराला लस मिळत नसल्याने मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. लोक लस मिळविण्यासाठी केंद्राबाहेर तासन्तान उभे राहून रांगा लावत आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ जातो आणि मनस्ताप सहन करावा लागतो. एवढं करूनही लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना   आहे. एकीकडे मोठय़ा प्रमाणावर लसटंचाई असताना दुसरीकडे नागरिकांना तांत्रिक गोंधळाचा सामना करावा लागत लागत आहे.

लशीची पहिली मात्रा घेतली तरी दुसरी मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र थेट नागरिकांना मिळू लागले आहे.   विरारला राहणाऱ्या अनिता वाझ (५२) यांनाही २८ जून रोजी दुसरी मात्रा घेतल्याचा संदेश मोबाइलवर आला आणि अग्रवाल केंद्रातून दुसरी लस घेतल्याचे प्रमाणपत्रही मिळाले.

लस घेतली नसताना दुसरी लस दिल्याचे खोटे प्रमाणपत्र आले आहे. मग आता दुसरी लस घ्यायची कशी? असा सवाल वाझ यांनी केला आहे. नालासोपारामध्ये राहणाऱ्या समीर सुर्वे या तरुणालादेखील दुसरी लस मिळालेली नसताना दुसरी लस घेतल्याचा मेसेज आणि प्रमाणपत्र मिळाले आहे. माझी दुसऱ्या लस मात्रेला  २५ जून रोजी ८४ दिवस पूर्ण झाले. पण लसटंचाई असल्याने मला दुसरी लस मिळू शकली नव्हती. गुरुवारी अचानक मला दुसरी लस घेतल्याचा मेसेज आला, असे त्याने सांगितले.

प्रमाणपत्रांवरील तारखांमध्येही घोळ

वसईच्या अंबाडी रोड येथील वसंत करिष्मा या इमारतीत राहणाऱ्या सुधा जोशी (५९) या महिलेला प्रमाणपत्रावरील चुकीच्या तारखांचा फटका बसला आहे.  त्यांनी १४ एप्रिल रोजी लशीची पहिली मात्रा पालिकेच्या धानिव येथील लसीकरण केंद्रातून घेतली होती. काही दिवसांनी त्यांना लस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळाले. प्रमाणपत्रावर लस घेतल्याची तारीख ही दोन महिन्यांची म्हणजे १४ जूनची आली आहे. केंद्रावर जाऊन चौकशी केली तेव्हा तिकडच्या कर्मचाऱ्यांनी आमची चूक नाही, असे सांगून हात वर केले. जोशी यांच्या लशीची दुसरी मात्रा जुलै महिन्यात आहे. पण प्रमाणपत्रावर सप्टेंबर महिना दाखविण्यात आला आहे. पालिकेने मात्र उपयोजन (अ‍ॅप) मधील तांत्रिक दोषामुळे असा घोळ होत असल्याचे सांगितले आहे. ८४ दिवस पूर्ण झाल्याने आपोआप उपयोजनमधून असा मेसेज जात असावा असे सांगितले. मात्र नागरिकांना  लस दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तांत्रिक चुकांमुळे असा गोंधळ झाला असण्याची शक्यता आहे. संबंधितांनी पालिकेशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या प्रमाणपत्रावरील चुका दुरुस्त करून दिल्या जातील. कुणीही लशींपासून वंचित राहणार नाही.

डॉ सुरेखा वाळके, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका

 

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा तांत्रिक दोष आहे. आम्ही अशा सर्व नागरिकांना दुसरी लस आणि सुधारित प्रमाणपत्र देऊ.

डॉ युग मिश्रा, प्रमुख, अग्रवाल लसीकरण केंद्र