करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान प्राणवायूअभावी सात रुग्णांचा मृत्यू;  वाढीव देयके आकारल्याचाही ठपका

वसई/ विरार : करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूअभावी सात रुग्ण दगावल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणि करोना रुग्णांना वाढीव देयके आकारून आर्थिक लूट केल्याचा ठपका असलेल्या नालासोपारा येथील विनायका रुग्णालयाचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून सन्मान करण्यात आला आहे.

एका खासगी कार्यक्रमात रुग्णालयाचा गौरव करण्यात आला असला तरी राज्यपाल आणि आरोग्यमंत्री यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

नालासोपारा येथील विनायका रुग्णालयावर करोनाकाळात रुग्णांकडून वाढीव देयके घेतल्याप्रकरणी अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातच १२ एप्रिल रोजी या रुग्णालयातील सात रुग्णांचा अकस्मात मृत्यू झाला. रुग्णालयातील गलथानपणामुळे प्राणवायू अभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांना केला होता. त्यानंतर पालिकेने एक समिती स्थापन करून रुग्णालयाची चौकशी सुरू केली आहे. असे असताना शनिवारी एका खासगी कार्यक्रमात या रुग्णालयाचा करोनाकाळात सेवा देणारे सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून गौरव करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रुग्णालयाचे प्रमुख डॉ. उपाध्याय यांचा गौरव करण्यात आला.

राज्यपाल आणि आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या सत्काराची छायाचित्रे रुग्णालयाने समाजमाध्यमावरून प्रसारित केल्यानंतर वसई, विरार शहरांतील नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय पक्षांनीही याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. ‘या रुग्णालयाने अनेकांना अवाजवी देयके देऊन त्यांची आर्थिक लूट केली आहे. ७ रुग्णांच्या मृत्यूला हे रुग्णालय जबाबदार आहे. मग अशा रुग्णालयाला पुरस्कार कसा दिला गेला,’ असा सवाल भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष मनोज बारोट यांनी केला. राज्यपालांच्या हस्ते सन्मान झाल्याने या कलंकित रुग्णालयाची प्रतिमा उजळ झाली आहे. त्यामुळे राज्यपालांनी हा पुरस्कार मागे घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरिट सोमय्या यांनीदेखील या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत संपूर्ण पुरस्कार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे स्वीय सहाय्यक डॉ. सचिन जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हा कार्यक्रम राजभवनातर्फे आणि खासगी वृत्तपत्रातर्फे आयोजित करण्यात आला होता. रुग्णालयांनी निवड आम्ही केली नाही. आम्हाला केवळ प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते,’ असे जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, पुरस्काराबद्दल विनायका रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रंजित उपाध्याय यांनी स्वत:ची पाठ थोपटली आहे. ‘आम्ही करोनाकाळात चांगले कार्य केले, सर्वाधिक रुग्ण तपासले म्हणून जिल्ह्य़ातील सर्वोत्कृष्ट उद्योन्मुख रुग्णालय म्हणून आमचा गौरव केला गेला,’ असे ते म्हणाले.