फिरते लसीकरण, रिक्षा रुग्णवाहिकेनंतर नऊ विभागीय करोना नियंत्रण केंद्रे बंद

प्रसेनजीत इंगळे
विरार : करोनाचे संकट टळले नसताना पालिकेने एकापाठोपाठ एक सेवा बंद करण्यास सुरुवात केली आहे. ४६ लसीकरण केंद्र बंद करण्याच्या वादग्रस्त निर्णय घेतल्यानंतर पालिकेने ९ विभागीय करोना नियंत्रण केंद्रे बंद केली आहेत. पालिकेने यापूर्वीच फिरते (मोबाइल) लसीकरण, रिक्षा रुग्णवाहिका आदी सेवा बंद केल्या आहेत. यामुळे वसई-विरार शहराचे नागरिक हवालदिल झाले आहेत.

मार्च महिन्यापासून करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला होता. दुसरी लाट आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी पालिकेचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी विविध सेवा सुरू केल्या होत्या. नागरिकांना लस मिळावी यासाठी परिवहन सेवेच्या बसद्वारे फिरते (मोबाईल) लसीकरण, विभागीय करोना नियंत्रण कक्ष, रिक्षा रुग्णवाहिका आदींचा समावेश होता. परंतु पालिकेने रिक्षा रुग्णवाहिका आणि मोबाइल लसीकरण यापूर्वीच बंद केले होते. आता पालिकेने विभागीय करोना नियंत्रण कक्षही बंद केले आहेत.

हे विभागीय करोना नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत होते. त्यात तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी आणि डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. रुग्णांना खाटा, औषध मिळवून देणे, घरी उपचार करणाऱ्या रुग्णांना औषधे मिळवून देणे, खासगी रुग्णालयांवर अंकुश ठेवणे आणि सर्वसमामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देणे आदी कामे या करोना नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत होती. परंतु मुख्यालय वगळता इतर सर्व विभागीय करोना नियंत्रण कक्ष बंद करण्यात आले आहेत. परंतु जनंसपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी मात्र केंद्र सुरू असल्याचा दावा केला आहे.  ‘लोकसत्ता’ने या सर्व केंद्रांवर संपर्क साधला

असता यातील एकही करोना नियंत्रण कक्ष रूम सुरू नसल्याचे आढळले. काहींचे संपर्क क्रमांक अस्तित्वात नाही तर काहींचे कायमचे बंद झाले आहेत. काही नियंत्रण कक्षात कुठे फोनच उचलले जात नाहीत, तर काही ठिकाणी कोणतेही कर्मचारी आणि डॉक्टर उपलब्ध नसल्याचे आढळळे. याबाबत पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांच्याशी संपर्क साधला असता करोना रुग्ण कमी झाल्याने करोना नियंत्रण कक्ष बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

बाल रुग्णालय अजूनही प्रतीक्षेत

पालिकेने तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम लहान मुलांवर होऊ शकतो. यासाठी दक्षता म्हणून विरार पश्चिमेला बोळींज येथे २०० खाटांचे बाल रुग्णालय तयार करायला घेतले होते. त्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने मागील महिन्यातच केला होता. पण अजूनही त्याला मुहूर्त सापडला नाही. या रुग्णालयाचे काम सध्या बंद असल्याची माहिती मिळाली आहे.

प्राणवायू प्रकल्प कागदावर

दुसऱ्या लाटेत शहरात सर्वाधिक प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. यासाठी पालिकेने विरारमधील बोळींज येथील कोविड रुग्णालय तसेच नालासोपारा येथील समेळपाडा विरार येथील चंदनसार रुग्णालयात येथे प्रकल्प उभारले जाणार होते. यातील एका प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही सुरू झाला नाही.

मोफत करोना कीट गायब  

पालिकेने सौम्य लक्षण असलेल्या नागरिकांना घरी अलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार कीट दिले जाणार होते. यात करोनावर उपचार करणारी औषधे देणार होते. यामुळे प्रकृती गंभीर होण्याच्या आधीच वेळेवर रुग्णांना उपचार मिळणार होते. यासाठी पालिकेने २५०० कीट घेतले होते. पण त्याचे काय झाले याची माहिती कुणाकडेच नाही.

१)  सध्या शहरातील करोना रुग्णाची संख्या कमी झाली आहे. यामुळे करोना वॉर रूम तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. केवळ मुख्य केंद्र सुरू आहे. तिथे डॉक्टर आणि इतर सेवक उपलब्ध आहेत.

– डॉ. सुरेखा वाळके, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका

२) रिक्षा रुग्णवाहिकेचा काही उपयोग झाला नाही. उलट पालिकेवर रिक्षांचे भाडे भरण्याचा भरुदड बसल्याने या सेवा बंद केल्या आहेत.

– विश्वनाथ तळेकर, प्रभारी साहाय्यक आयुक्त

केवळ पाच जम्बो केंद्रे

वसई-विरार शहरात पालिकेने ५१ लसीकरण केंद्रे उभारली होती. त्यापैकी ४६ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची सुरुवात झाली असून ३६ केंद्रे बंद करून १५ केंद्रे सुरू ठेवली आहेत. येत्या काही दिवसात केवळ ५ जम्बो केंद्रे सुरू करून उर्वरित केंद्रे बंद केली जातील असे आयुक्त गंगाथरन डी. यांनी सांगितले.

मोबाईल लसीकरण बंद

महानगरपालिकेने लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मोबाइल लसीकरण व्हॅन ही संकल्पना अंमलात आणली होती. यानुसार पालिका ग्रामीण भागात तसेच शहरी भागात वसई-विरार महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या बस वापरून ही यंत्रणा राबवत होती. महिनाभरात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. १२ हजारहून अधिक नागरिकांचे  लसीकरण करण्यात आले होते. यासाठी पालिकेने परिवहन विभागाच्या बसमध्ये काही ठरावीक बदल केले होते. ग्रामीण भागासाठी ही यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरत होती. पण अचानक पालिकेने या यंत्रणेचा गाशा गुंडाळत ही मोहीम बंद केली.

रिक्षा रुग्णवाहिका बंद

पालिकेने रुग्णांना रुग्णालयात ने-आण करणे सोयीस्कर व्हावे म्हणून शहरात तसेच ग्रामीण भागात मोफत रिक्षा रुग्णवाहिकांचे जाळे उभारण्याचा मानस आखला होता. सुरुवातीला १०० रिक्षा सुरू केल्याच्या दावा पालिकेने केला होता. पण महिनाभराच्या आताच या मोहिमेचा गाशा गुंडाळला. या संदर्भात माहिती देताना परिवहन विभागाचे प्रभारी साहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले की, नागरिकांना त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आणि पालिकेला रिक्षाचे अतिरिक्त भाडे द्यावे लागत होते. शहरातील रुग्ण संख्या झपाटय़ाने कमी होत आहे म्हणून पालिकेने हा निर्णय घेतला आहे.