शहरातील पालिकेची ४६ लसीकरण केंद्रे बंद, खासगी २९ रुग्णालयांना परवानगी

सुहास बिऱ्हाडे

वसई : शहरात लसटंचाई असल्याने पालिकेने ५१ पैकी ४६ लसीकरण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे केवळ ५ लसीकरण केंद्रे सुरू ठेवली जाणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने २९ खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. यामुळे नागरिकांना आता लस विकत घ्यावी लागणार आहे.

१६ जानेवारी रोजी राज्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. शुक्रवारी या मोहिमेला सहा महिने पूर्ण झाले. पालिकेतर्फे एकूण ५१ ठिकाणी लसीकरण केले जात होते. त्यात पालिकेची आरोग्य केंद्रे आणि कम्युनिटी केंद्रांचा समावेश होता. गेल्या काही दिवसांपासून शहरात लसटंचाई निर्माण झाली आहे. पालिकेला लशींचा साठा कमी मिळत आहे. ज्या लशी पालिकेला मिळायच्या त्या सर्व केंद्रावर वाटल्या जायच्या; परंतु मुळात लशी कमी असल्याने केंद्रावर ५० ते १०० लशी मिळायच्या. या लशींसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडायची. ती निवारण्यासाठी पालिकेचे मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ खर्ची होत होते. दुसरीकडे अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात लसीकरण केंद्रे सुरू केली होती. यामुळे मोठय़ा प्रमाणावर वशिलेबाजी होऊ लागली होती. या सर्व गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जायचा आणि पालिकेवर मोठा ताण पडायचा. त्यामुळे पालिकेने आता प्रमुख केंद्र वगळता इतर सर्व ४६ लसीकरण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही लशींचा साठा मिळविण्यासाठी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहोत; परंतु लशी कमी येत असल्याने लस देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे आता केवळ ५ केंद्रे वगळता इतर लसीकरण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी दिली. यापूर्वी महापालिकेने फिरते (मोबाइल) लसीकरण मोहीम सुरू केली होती. प्रत्येक ९ प्रभागात १ बस ठेवून ४५ वर्षांवरील तसेच ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात होते. मात्र आयुक्त गंगाधरन डी. यांनी हे फिरते मोबाइल लसीकरणदेखील बंद केले आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी

पालिकेने इतर लसीकरण केंद्रे बंद केली असली तरी नागरिकांना लस मिळावी यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली सिंग यांनी दिली. थेट कंपनीकडून लस विकत घेणे किंवा राज्य शासनाकडून लस विकत घेऊन वितरित करणे असे दोन पर्याय खासगी रुग्णालयांना देण्यात आले होते. त्यानुसार वसईतील योग्यम रुग्णालय, विरारमधील निदान आणि नालासोपारामधील अनुसया रुग्णालयांना थेट कंपनीकडून लस विकत घेऊन विकत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय २६ रुग्णालयांना राज्य शासनाकडून लस विकत घेऊन शासकीय दराने विक्री करणार आहे. त्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती डॉ. सिंग यांनी दिली.

दुसऱ्या मात्रेला प्राधान्य

वसई-विरार शहरातील लोकसंख्या २२ लाख गृहीत धरून लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र १५ जुलैपर्यंत केवळ १२.८ टक्के लसीकरण झालेले आहे. त्यात लशींची पहिली मात्रा १०.१ टक्के जणांना, तर दुसरी मात्रा केवळ २.७ टक्के जणांना देण्यात आली आहे. लसटंचाई असल्याने दुसरी मात्रा मिळविण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस केवळ दुसरी मात्रा असलेल्यांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी दिली.

खालील ५ केंद्रांवर यापुढे मिळणार लस

  • तुळींज रुग्णालय
  • अग्रवाल रुग्णालय
  • गुजराथी शाळा, माणिकपूर
  • बोळींज केंद्र
  • सर डीएम पेटिट रुग्णालय

प्रत्येकाला आपल्या घराजवळ लस केंद्र मिळणार नाही. मर्यादित लस केंद्रे असल्याने लशींचे वितरण आणि नियोजन सुलभ होणार आहे.

– डॉ. सुरेखा वाळके, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई विरार महापालिका 

शहरातील ५१ पैकी ४६ लसीकरण केंद्रे बंद केली जाणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एकूण २९ रुग्णालयांना लस विकत घेऊन नागरिकांना विक्री करण्याची परवागनी देण्यात आली आहे.

– डॉ. अंजली सिंग, लसीकरण मोहीम प्रमुख, वसई-विरार महापालिका