|| सुहास बिऱ्हाडे

वसई: वसई-विरार शहरातील करोना नियंत्रणात असला तरी प्रशासनाने गाफिल न राहता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी त्रिसूत्री उपाययोजना सुरू आहे. खाट आणि रुग्णालयांमध्ये वाढ, बालकांच्या रुग्णालयाची निर्मिती आणि स्वत:ची प्राणवायू निर्मिती अशी ही त्रिसूत्री योजना आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि चीनमधून आरोग्याची यंत्रसामुग्री खरेदी केली जात आहे.

मार्च महिन्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला आणि अवघ्या काही दिवसात करोनाने शहरात हाहाकार उडवला होता. एप्रिल आणि जून महिन्यात हजारो लोकांना करोनाची लागण झाली आणि शेकडो लोकांचे बळी गेले. गाफील राहिल्याने साधनसामुग्री, प्राणवायू, औषधांची कमतरता यामुळे अनेकांना प्राण गमवावा लागला होता. आता करोनाचा आलेख खालावत असून दुसरी लाट आटोक्यात येत आहे. परंतु त्याचबरोबर करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने गाफिल न राहता तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्रिसूत्री योजना तयार केली आहे.

पालिकेची सध्या महापालिकेच्या रुग्णालयात लागणारा प्राणवायू हा बाहेरील राज्यातून  मागविला जातो. मात्र इतक्या लांबून प्राणवायू मागविण्यासाठी मोठ्या अडचणी येत असल्याने पालिकेने स्वत:च प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या पाचही करोना उपचार केंद्रात  ५ प्राणवायू निर्मिती प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सांगितले. विशेष म्हणजे यातून पालिकेला ५ मॅट्रीक टन प्राणवायू दिवसाला मिळणार आहे. याशिवाय पालिकेने ३०० ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्रे खरेदी कºण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ४ वेगवेगळ्या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले आहे. अमेरिका, चीन आणि जर्मनी आदी देशांमधून हे ऑक्सीजन कॉंसंट्रेटर मागविण्यात येत आहे. यासाठी पाचही करोना उपचार केंद्रात प्रत्येकी एक असा एकूण ५ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तयार करण्यात येणार. यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. करोना रुग्णांसाठी पालिकेने खास कार्डियॅक रुग्णवाहिका आणण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभाग अधिक बळकट करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.

रुग्णालय आणि खाटांमध्ये वाढ

सध्या पालिकेचे वसईतील वरुण इंडस्ट्री येथे करोना केंद्र आहे तर विरारच्या चंदनासार येथे करोना रुग्णालय आहे. वरुण इंडस्ट्रीमध्ये सध्या प्राणवायूच्या २०० आणि अतिदक्षता विभागाच्या १०० खाटा आहे. त्यात वाढ करण्यात आली आहे. या ठिकाणी प्राणवायूच्या १०० खाटा आणि अतिदक्षता विभागाच्या ५० खाटा वाढविण्यात येत आहे. यामुळे करोनाची लाट आल्यास अधिकाधिक रुग्णांना या केंद्रात उपचार मिळू शकणार आहेत. या शिवाय पालिकेने नालासोपारा येथील सुसज्ज मासळी बाजाराचे रूपांतर रुग्णालयात केले आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागग आणि प्राणवायूच्या २०० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने विरारच्या बोळींज येथे खास लहान मुलांसाठी १०० खाटांचे रुग्णालय तयार केले आहे.

आम्ही संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जय्यत तयारी केली असून त्रिसूत्री उपाययोजना तयार केल्या आहेत. याशिवाय ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल त्याची तयारी करत आहोत. -गंगाथरन डी.- आयुक्त, वसई विरार महापालिका