शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे ओसंडू लागली

विरार : मागील काही दिवसांपासून धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावासामुळे वसईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पेल्हार आणि उसगाव धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. तर सूर्या प्रकल्पातील धामणी नदीदेखील ३५ टक्केपेक्षा अधिक भरली आहे.

जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने नागरिकांच्या चिंता वाढविल्या होत्या. पण जुलै महिन्याच्या पंधरवाडय़ात पावसाने दमदार आगमन करत सर्वच्या चिंता दूर केल्या. जून महिन्यात  कमी पाऊस पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी खालावली होती. ऐन मोसमात पाऊस न पडल्याने शहरावर पाणी टंचाईचे संकट घोंगावत होते. पालिकेने अनेक भागातील पाणीपुरवठा अनियमित केला होता. त्याच बरोबर नव्या नळ जोडण्यांना स्थगिती दिली होती.

पण आता पावसाने सारावांच्याच चिंता मिटवल्या आहेत. वसई विरार परिसरात मागील तीन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आतापर्यंत १ हजार ५३२मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळए वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची पातळी वाढली आहे.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा येथील पेल्हार आणि विरार येथील उसगाव धरणे

मागील दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने ओसंडून वाहत आहेत तर सूर्या प्रकल्पाचे धामणी धारण अजुनही ३५. १३ टक्के भरले आहे. पण इतर दोन धरणाची पातळी ओलांडल्याने शहरात पाणी समस्या निर्माण होणार नसल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे.