भुईगाव समुद्रातील संशयास्पद बोटीचे गूढ २६ तासांनी उकलले

वसई:   वसईच्या भुईगाव समुद्रात गुरुवारी आढळलेल्या संशयास्पद बोटीचे गूढ अखेर शुक्रवारी सकाळी उलगडले. ही मालवाहू बोट भाईंदरवरच्या उत्तन येथून भरकटून भुईगावच्या खडकाळ समुद्रात अडकली होती. मात्र बोटमालकाने वेळीच पोलिसांना माहिती न दिल्याने सुरक्षा यंत्रणांची दमछाक झाली होती. शुक्रवारी सकाळी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने या बोटीत घाबरून लपून बसलेल्या एकमेव खलाशाची २६ तासांनी सुखरूप सुटका केली.

संशयास्पद बोट समुद्रकिनाऱ्यापासून  सुमारे साडेपाच किलोमीटर आत अर्नाळापाडा दीपस्तंभाच्या समोर होती.    बोटीची माहिती मिळताच पोलीस भुईगाव किनाऱ्यावर पोहोचले होते. मात्र बोटीजवळ जाता येत नव्हते. पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याने बोटीची हवाई तपासणी केली तेव्हा बोटीवर एक संशयित इसम दिसला आणि संशयाला पुष्टी मिळाली. दरम्यान, संध्याकाळ झाल्याने पोलीस आणि तटरक्षक दलाने तपास थांबवला. संशयास्पद बोट समुद्रात असल्याने अफवांना ऊत आला होता. नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसरात फौजफाटा तैनात करून सर्वांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या.

सुटकेचा थरार

शुक्रवारी सकाळी ६ पासून पुन्हा पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याने तपास सुरू केला. तटरक्षक दलाने  दमण येथून चेतक हेलिकॉप्टर मागवले. हेलिकॉप्टरने बोटीवरील खलाशी रफिक शेख (३०) नामक व्यक्तीला संपर्क केला आणि त्याला दोरीच्या साहाय्याने वर काढले. याचवेळी भाईंदर येथील बोटीचा मालक अख्तार काळोखे याने पोलिसांना संपर्क करून या बोटीची माहिती दिली आणि या संशयास्पद बोटीचे गूढ उकलले. ‘हिरादेवी’ नावाची ही बोट भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर नांगरली होती. या मालवाहू बोटीतून बांधकामाचे साहित्य, वाळू, इतर बोटींसाठी डिझेल आदी साहित्याची ने-आण केली जायची. दोन महिन्यांपूर्वीच मालकाने ती बोट २६ लाखांना विकत घेतली होती. गुरूवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही बोट उत्तनच्या बंदरात असताना  चालक किनाऱ्यावर गेला. त्यावेळी बोटीचा दोरखंड तुटला आणि बोट समुद्रात भरकटली.

मोबाइलमध्ये ‘बॅलन्स’ नव्हता

बोट समुद्रात भरकटल्यानंतर बोटीवरील खलाशी रफिक याला कुणालाच कळवता आले नव्हते. कारण त्याच्या मोबाइलमध्ये बॅलेन्स नव्हता, असे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितले. दुपारी दीड वाजता  मालक काळोखे यांनी खलाशी रफिक याला संपर्क केला तेव्हा बोट हरवल्याचे  समजले. मात्र त्यांनी पोलिसांना न कळवता स्वत:च शोध सुरू केला होता.  बोटीचा मालाक आणि खलाशी रफिक एकमेकांच्या संपर्कात होते.  बोट मालकाच्या या बेफेकिरीमुळे सर्वांना मनस्ताप झाला असे  परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितले. बोट अद्याप मालकाच्या नावावर झालेली नाही. पोलिसांनी दिवसभर मालक आणि खलाशी यांची चौकशी केली. त्यांच्यावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का त्याची चाचपणी पोलीस करत आहेत.