वसई: वसईत दुसऱ्या सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला आहे. त्यामुळे वसई विरार शहर जलमय होऊन अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचून राहिल्याने जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांचे हाल झाले आहेत.

वसई विरार भागात शनिवारी रात्रीपासून पावसाने अक्षरश: थैमान घातले होते. त्यामुळे वसई विरार मधील विविध ठिकाणच्या भागात मोठय़ा प्रमाणात साचले होते.यामुळे ये जा करण्याचे बहुतांश मार्ग हे पाण्याखाली गेले. तर अनेक ठिकाणी चाळीत, गृहसंकुलात पाणी गेल्याने नागरिकांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वाहने ही पाण्यात बुडून गेल्याने वाहनात पाणी जाऊन वाहनांचे ही मोठे नुकसान झाले आहे. रविवार व सोमवार या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणच्या भागात साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने बहुतांश भाग पाण्याखालीच होता.  नालासोपारा पूर्व ,स्टेशन परिसर, आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, वालीव, मेकडील गास, टाकी पाडा, वसईतील मिठागर वस्ती नवघर , सनसिटी रोड,  गोलानी नाका, एव्हरशाईन , वसंतनगरी आदी ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नव्हता तर सनसिटी रस्ताही पाण्याखाली गेला.  इतर ठिकाणच्या रस्त्यावरही पाणी ओसरले नसल्याने कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांना  व वाहनधारकांना या पाण्यातून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागली.