विरार : वसई पूर्वेच्या रेंज नाका परिसरात पाहायला मिळाला आहे. एका खासगी वाहनबाजार व्यावसायिकाने रस्त्याबरोबर चक्क पुलावर विक्रीची वाहने उभी करून पुलाचा कब्जा केला आहे. यासंदर्भात  कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वसई-विरारमध्ये अवैध्य गॅरेज, आठवडे बाजार आणि फेरीवाल्यांनी आधीच शहरातील रस्ते काबीज केले आहेत. यावर अनेक वेळा नागरिकांनी मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. यात आता वाहन बाजार भरवणाऱ्या व्यावसायिकांचा भरणा होत  आहे. वसईच्या अंबाडी रोडवर मोठय़ा प्रमाणात गॅरेज आणि वाहन विक्रेत्यांनी कित्येक वर्षांपासून आपले रस्ते काबीज केले आहेत. आता महामार्गावरील रस्तेसुद्धा गॅरेज आणि वाहन विक्रेते हडप करत आहेत. वसईच्या रेंज नाका परिसरातील रस्ता हा महामार्गाला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर शेकडो वाहने दिवसरात्र ये-जा करत असतात. अशातच रेंज नाका येथील पुलावर एका वाहन विक्रेत्याने आपली वाहने रस्त्याबरोबर येथील अरुंद पुलावर उभी करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे हा पूल अधिकच अरुंद झाला असून इतर वाहनांना जाताना मोठा अडसर निर्माण होत आहे.  नागरिकांनी पालिका आणि वाहतूक पोलिसांना तक्रारी केल्याचे सांगितले आहे. पण यावर कोणतीही कारवाई करण्यात  नाही. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.