|| सुहास बिऱ्हाडे,

शहरातील वैद्यकीय तपासणी केंद्र कागदावरच

वसई : वसई-विरार शहरातील बलात्कार पीडित महिलांची वैद्यकीय तपासणीसाठी परवड सुरूच आहे. वसई-विरार शहरात तपासणी केंद्रच नसल्याने या महिलांना तपासणीसाठी मुंबईला न्यावे लागते. त्यामुळे वेळ वाया जातो आणि पुरावा नष्ट होण्याचा धोकाही असतो. शहरात केंद्र सुरू करण्याचे पालिकेचे आश्वासन केवळ पोकळ घोषणा ठरली आहे.

वसई-विरार शहरात महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बलात्कार पीडित महिलेची तक्रार आल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करावी लागते. सबळ पुराव्यासाठी सखोल तपासणीची गरज असते. त्यासाठी अशा वैद्यकीय तपासणीसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, न्यायवैद्यक तज्ज्ञांची आवश्यकता असते. मात्र शहरात बलात्कार पीडित महिलांच्या तपासणीचे केंद्रच नसल्याने त्यांना मुंबईच्या नायर किंवा जे. जे. रुग्णालयांत तपासणीसाठी जावे लागते. मुंबईला तपासणीसाठी नेताना कागदपत्रांची पूर्तता करणे, रुग्णालयात जाणे यात कधी कधी दोन ते तीन दिवसांचा वेळ जातो आणि पुरावे नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. या त्रासामुळे पीडित महिला तक्रार देत नाहीत. वसई-विरार शहरात असे बलात्कार पीडित महिलांसाठी तपासणी केंद्र सुरू करावे असा प्रस्ताव पोलिसांनी वसई-विरार महापालिकेकडे दिला होता. आयुक्तांनी देखील लवकरच असे केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्याची पूर्तता न झाल्याने बलात्कार पीडितांची ससेहोलपट आणि परवड सुरूच आहे.

याबाबत माहिती देताना मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांनी सांगितले की, बलात्कार पीडित महिलांची तपासणी केवळ शासकीय रुग्णालयात होणे गरजेचे आहे, असा शासकीय नियम आहे. विरार येथे शासकीय रुग्णालय आहे. तेथे न्यायवैद्यक तज्ज्ञ नाहीत स्त्रीरोग तज्ज्ञही पूर्ण वेळ नसतात. त्यामुळे आम्ही त्यांना मुंबईला घेऊन जातो. परंतु या शहरातच तपासणी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. केवळ प्राथमिक तपासणी केली तर पुरावे मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. करोनामुळे प्रशिक्षणही  बारगळले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अशा प्रकरणात तपासणी कशी करावी, पुरावे कसे गोळा करावे याचे प्रशिक्षण मुंबईतील न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून दिले जाणार होेते. जेणेकरून जिल्हा रुग्णालयातच तपासणी झाली असती. परंतु मागील वर्षापासून आलेल्या करोनामुळे सर्व आरोग्य यंत्रणा करोना निवारण्याच्या कामात व्यग्र झाली आणि हे प्रशिक्षण रखडल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये आधीच सुविधा अपुऱ्या असल्याने तसेच तज्ज्ञ डॉक्टर मिळत नसल्याने त्यांना ही सुविधा देता येत नाही. आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

तक्रारी न देण्याकडे वाढता कल

बलात्कार पीडित महिलेचे मानसिक खच्चीकरण झालेले असते. त्यात सर्व तपासणी एकाच दिवसात होत नसल्याने त्यांना दोन-तीन वेळा रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे सतत पोलीस ठाण्यात हजर राहावे लागते. त्यामुळे अनेकदा बलात्कार पीडितांचा कल तक्रार न देण्याकडे असतो. शहरातून दररोज ४ ते ५ अल्वपयीन मुली पळून जात असतात. त्या जेव्हा सापडतात तेव्हा या त्रासामुळे पालक बलात्काराची तक्रार देण्यास उत्सुक नसतात. लग्नाचे आमिष दाखवून सज्ञान मुलींशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. त्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी तक्रार दिलेली असते. परंतु वैद्यकीय तपासणीसाठी वारंवार मुंबईला जाणे शक्य नसल्याने त्यासुद्धा नंतर तक्रारी देत नाहीत किंवा तक्रार दिल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी हजर राहात नाहीत. बलात्कार पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी नेताना महिला पोलीस कर्मचारी सोबत द्यावी लागते. त्यामुळे पोलिसांचाही वेळ जातो. आधीच वसईतील पोलीस ठाण्यात महिला पोलिसांची संख्या कमी आहे. त्यात तपासणीच्या कामासाठी मुंबईला जावे लागत असल्याने महिला पोलिसांचाही दिवस वाया जातो.

नव्या नियमात तज्ज्ञांची गरज नाही?

याबाबत पालघर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर यांच्याशी संपर्क साधला असता, नवीन नियमांप्रमाणे आता बलात्कार पीडित महिलांची तपासणी एमबीबीएस डॉक्टर करू शकत असल्याची माहिती त्यांनी दिली. क्लिष्ट प्रकरणे आणि सखोल तपासणी असेल तरच मुंबईला नेले जाते, असे ते म्हणाले. आमच्याकडे प्राथमिक वैद्यकीय तपासणीची सोय असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

नवीन नियमांनुसार प्राथमिक तपासणी एमबीबीएस डॉक्टर करू शकतो. त्यामुळे आमच्या शासकीय रुग्णालयात बलात्कार पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी केली जाते. – डॉ. राजेंद्र केळकर, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर

बलात्कार पीडित महिलांची तपासणी सरकारी रुग्णालयात करणे आवश्यक असते. परंतु शहरातील सरकारी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, न्यायवैद्यक तज्ज्ञ यांचा अभाव असल्याने आम्हाला नाईलाजाने मुंबईला न्यावे लागते. परंतु आम्ही शहरातच तपासणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. – एस. जयकुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय