News Flash

गरजू विद्यार्थ्यांकडे साधनसामग्रीचा अभाव

करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

दूरदर्शनद्वारे शिक्षण केवळ २५०५ विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचू शकत आहे.

मोबाइल टॅब देण्याची मागणी; व्यत्ययामुळे पालिका विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष

भाईंदर : करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत खासगी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र पालिका शाळेत शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांकडे साधनसामग्रीचा अभाव असल्याने शिक्षणात व्यत्यय येत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पालिका प्रशासनाकडून मोबाइल टॅब देण्याची मागणी करण्यात आली आहे.

करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना अधिक बसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे लसीकरण पूर्ण होईपर्यंत शाळा सुरू करण्यात येणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार सातत्याने करण्यात येत आहे. त्यात मीरा-भाईंदर शहरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मीरा-भाईंदर शहरात महानगरपालिकेच्या एकूण ३५ शाळा असून त्यात मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार १७० इतकी आहे. यात पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मोबाइल फोन नसलेल्यांची संख्या ७०० आहे, तर १९६७ विद्यार्थ्यांकडे साधे फोन आहेत. तसेच दूरदर्शनद्वारे शिक्षण केवळ २५०५ विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचू शकत आहे. आणि  २१६६ विद्यार्थ्यांकडे ‘अ‍ॅण्ड्रॉइड फोन’ असल्यामुळे त्यांना ‘झूम’ आणि ‘व्हाट्सअ‍ॅप’द्वारे शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे इतक्या अडचणींमुळे मुलांचे भविष्य अंधकारमय भीती निर्माण झाली असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पालिकेमार्फत मोबाइल टॅब देऊन शिक्षणावर भर देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

‘गणवेश व इतर खर्चांचा वापर टॅबवर करावा’

मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनकडून गेल्या दोन वर्षांपासून पालिका शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता गणवेश व इतर सामग्री घेण्याकरिता काढलेली निविदा मागे घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे करोनाचा धोका डोक्यावर असल्याने शाळा सुरू करणे अद्यापही कठीण होणार आहे. त्यामुळे या वर्षी हा खर्च मुलांना मोबाइल किंवा टॅब उपलब्ध करून देण्याकरिता करावा, अशी मागणी शिवसेना नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी पालिका प्रशासनाजवळ केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:01 am

Web Title: needy students mobile tab against the backdrop of corona education through online system akp 94
Next Stories
1 निर्बंध शिथिल, नियम पायदळी!
2 पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेवर संकट
3 म्युकरमायकोसीससाठी कौल सिटी रुग्णालयात ४५ खाटांची उपलब्धता
Just Now!
X