वसई-विरारसह पालघर जिल्हा पुन्हा टप्पा क्रमांक ३ मध्ये

वसई: पालघर जिल्ह्यचा सकारात्मक दर ५ टक्के वाढल्याने जिल्हा पुन्हा टप्पा क्रमांक ३ मध्ये समावेश करण्यात आला आहे. सोमवार २१ जूनपासून नवीन निर्बंध लागू करण्यात येणार आहे. शुक्रवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश लागू केले.

राज्य शासनाने टाळेबंदी निर्बंध करण्याबाबतचे नवीन निर्देश जाहीर केले होते. त्यानुसार ५ स्तरीय टप्प्यात विभागणी करण्यात आली होती. चालू आठवडय़ातील जिल्ह्यतील रुग्णांचा सकारात्मक दर,प्राणवायू खाटांची उपलब्धता यानुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाना र्निबधांच्या टप्प्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

चालू आठवडय़ाच्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यचा रुग्ण सकारात्मक आढळण्याचा दर हा ५.१८ म्हणजे ५ टक्कय़ांच्या वर गेला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यचा समावेश टप्पा क्रमांक २ मध्ये करण्यात आला आहे. मागील आठवडय़ात प्राणवायू रुग्ण खाटांचे प्रमाण हे २७ टक्के होते. चालू आठवडय़ात हे प्रमाण १८ टक्के एवढे कमी झाले आहे. मात्र रुग्ण सकारात्मकतेचा दर हा ५ टक्कय़ांच्या वर गेल्याने जिल्ह्यचा समावेश टप्पा क्रमांक २ मध्ये करण्यात आला आहे.

याशिवाय जिल्ह्यतील खाटांची रिक्तता ही २७.६६ टक्के एवढी आहे. जिल्ह्यत एकूण  १ हजार ७९३ प्राणवायूच्या खाटा असून त्यातील केवळ ३२७ प्राणवायूच्या खाटा या भरलेल्या आहेत. म्हणजेच १ हजार ४६६ खाटा या रिक्त आहेत.

टाळेबंदी शिथील केल्यानंतर नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करून व्यवहार सुरू ठेवले होते. त्यामुळे रुग्ण सकारात्मक आढळण्याचे प्रमाण वाढले होते. म्हणून वसई विरारसह पालघर जिल्हा टप्पा क्रमांक ३ मध्ये टाकण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिली.

असा असेल टप्पा क्रमांक ३

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने— सकाळी ७ ते संध्याकाळी ४
  • इतर दुकाने— सकाळी ७ ते संध्या ४ ( शनिवार—रविवार पूर्ण बंद)
  • उपाहारगृह— सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते संध्या ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने
  • सार्वजनिक मैदाने, उद्याने— सकाळी ५ ते सकाळी ९
  •  खासगी कार्यालये— संध्याकाळी ४ पर्यत