मीरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात ४५० अधिकारी आणि १७५० पोलीस कर्मचारी तैनात

विरार : रविवारी अनंत चतुर्दशीदिनी होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. यात मीरा-भाईंदरपासून वसई-विरार परिसरात ४५० अधिकारी आणि १७५० पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर वाहतूक शाखा, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान शहरात तैनात करण्यात आले आहेत.

रविवारी मीरा-भाईंदर आणि वसई-विरार मिळून ८५ तलावांवर गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. यातील वसई-विरार परिसरात नऊ प्रभागांत ४३ ठिकाणी विसर्जन केले जाणार आहे. यात प्रभाग समिती अ मध्ये ७ ठिकाणी, ब मध्ये २, सी मध्ये ३, डी मध्ये २, इ मध्ये ६, एफ मध्ये ६, जी मध्ये ८, एच मध्ये २, आय मध्ये ९ ठिकाणी विसर्जन केले जाणार आहे.

वसई-विरार महापालिकेने या वर्षी कोणत्याही कृत्रिम तलावाची निर्मिती केली नाही; परंतु मीरा-भाईंदर पालिकेने चार कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. या वर्षी करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांची गर्दी उसळणार आहे. विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस दलाने विसर्जन तलाव, मोक्याचे नाके, वाहतूक कोंडी होणारे परिसर तसेच इतर काही ठिकाणी नाकाबंदीसाठी पोलीस तैनात केले आहेत.

वाहतूक पोलिसांनी विसर्जनाच्या तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर गर्दी होऊन कोंडी निर्माण होणार नाही यासाठी तलावाजवळील मार्ग एकमार्ग केले जाणार असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवली जाणार असल्याची माहिती दिली. तसेच मिरवणुका आणि वाजंत्री यावर बंदी असल्याने अशा मंडळांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरात अंदाजे साधारणपणे ३०० सार्वजनिक मंडळे, १० हजारच्या जवळपास घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे.