गोखीवरे येथील स्मशानभूमीची दुरवस्था, अंत्यविधी करताना अडचणी

वसई: वसई पूर्वेतील गोखीवरे येथील भागात तयार करण्यात आलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून छप्पर उडाल्याने अंत्यविधी पावसात भिजत करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. स्मशानाच्या दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. यामुळे या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वसई पूर्वेतील भागात गोखीवरे परिसर आहे. या ठिकाणच्या भागात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन शेड, चार शेगडय़ा व बाजूला बसण्यासाठी सिमेंटची बाकडी अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु या स्मशानभूमीच्या देखभाल करण्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने येथील छप्पर व इतर साहित्याची पडझड झाली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने येथील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. स्मशानभूमीवर छप्पर नसल्याने पावसाचे पाणी थेट आतमध्ये येत आहे. त्यामुळे या भर पावसात भिजत नागरिकांना अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यात लाकडेही भिजून गेल्याने प्रेताला पटकन अग्नी लागत नाही. यामध्ये बराच वेळ वाया जात आहे.

नुकता गोखीवरे येथील नागरिक या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलो होतो. या वेळी या स्मशानभूमीवर छप्पर नसल्याने छत्र्या हातात पकडून त्यावर अंत्यसंस्कार करावे लागले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी सोबत येणारे नातेवाईक व इतर नागरिक यांना उभे राहण्यासाठीही येथे जागा नसल्याने गैरसोय निर्माण होत आहे.

गोखीवरे येथील स्मशानभूमीवरील छप्परच तुटून गेले आहेत. त्या पावसात येथे अंत्यविधीस येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा. पालिकेने नागरिकांची गैरसोय लक्षात घेता याची दुरुस्ती करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

– नरेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते गोखीवरे