केंद्रांवरील ‘र्बुंकग स्लॉट’ची माहिती देणारे संकेतस्थळ; एक महिन्यात १५ हजार जणांना लाभ

वसई : करोना लसीकरणासाठी नोंदणी (बुकिंग स्लॉट) करण्यासाठी वसईतील दोन तरुणांनी तयार केलेले संकेतस्थळ चांगलेच उपयुक्त ठरत आहेत. महिन्याभरातच १५ हजार जणांना या संकेतस्थळाचा लाभ झाला. या संकेतस्थळावरून कुठल्या केंद्रात लस उपलब्ध आहे त्याची माहिती मिळते आणि नोंदणीसाठी होणारी वणवण थांबते. विशेष म्हणजे हे संकेतस्थळ विनामूल्य असून सामाजिक बांधीलकीतून ते तयार करण्यात आले आहे.

करोना प्रतिबंधक लस ही सध्या सर्वांसाठी प्राधान्याची गोष्ट ठरली आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी कोविन अ‍ॅपवर जाऊन नोंदणी करावी लागते आणि ज्या केंद्रात नोंदणीसाठी जागा खुल्या होतात (बुकिंग स्लॉट) तिथे लगेच नोंदणी करावी लागते. मात्र एवढ्या केंद्रामधून कुठल्या केंद्रावर स्लॉट खुले झाले आहेत याची माहिती मिळत नव्हती. ते स्लॉट शोधण्यासाठी वेळ जात होता. ही अडचण लक्षात घेऊन वसईतील अभिषेक आणि प्रथमेश घरत या भावांनी विशेष संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून कुठल्या केंद्रावर स्लॉट खुले झाले आहेत त्याची माहिती मिळते. एका महिन्यात १५ हजार जणांनी या संकेतस्थळाद्वारे नोंदणी करून लस घेतली आहे.

असे काम करते संकेतस्थळ

लसीकरणासाठी बुकिंग स्लॉट मिळवून देण्यासाठी अभिषेक आणि प्रथमेश घरत यांनी ऑटो वॅक सॅक (ऑटोमॅटिक वॅक्सिनेशन स्लॉट अवेलिबिलिटी चेकर) नावाचे संकेतस्थळ तयार केले आहे. त्यावर वय, जिल्हा, राज्य आणि पिनकोड एवढीच माहिती टाकायची. त्यानंतर जवळच्या ज्या केंद्रात स्लॉट खुले झाले आहेत त्याची माहिती मिळते. स्लॉट खुले होताच एक अलार्म वाजतो आणि माहिती मिळते. हे संकेतस्थळ कोविन अ‍ॅपच्या एपीआयशी (अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) बरोबर संलग्न असते. त्यामुळे ज्या केंद्रांवर स्लॉट खुले होतात त्याची माहिती आपोआप मिळते आणि ती नोंदणीकत्र्याला पुरवली जाते. आमचे संकेतस्थळ बुकिंग मिळवून देत नाही तर कुठल्या केंद्रावर बुकिंग स्लॉट उपलब्ध आहेत, त्याची माहिती देते. यामुळे वेळ आणि मनस्ताप वाचतो, असे अभिषेक घरत याने सांगितले. घरत बंधूंची क्राफ्टपिक्सेल ही आयटी कंपनी आहे.