|| सुहास बिऱ्हाडे

महापौर नसल्याने सहाय्यता निधीचे वाटप नाही; खेळाडूही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत

वसई : वसई विरार महापालिकेत महापौरच नसल्याने महापौर सहाय्यता निधीपासून गरीब गरजू रुग्ण वंचित राहिले आहे. मागील वर्षांत केवळ ७ जणांना महापौर निधीतून आर्थिक मदत मिळाली होती. एकीकडे महापौर साहाय्यता निधी रुग्णांना मिळत नसताना दुसरीकडे दुसरीकडे पालिकेच्या उदासिनतेमुळे क्रीडा शिष्यवृत्तीचेही वाटप होत नसल्याने शहरातील शेकडो होतकरू खेळाडूंची आर्थिक मदतीअभावी परवड होत आहे.

महागडा वैद्यकीय उपचार गरीब रुग्णांना परवडत नसल्याने त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी महापौर सहाय्यता निधीची संकल्पना महापालिकेच्या कार्यकारी सदस्यांनी मांडली होती. त्यावर विचार करून शहरातील गरीब आणि गरजू नागरिकांना वैद्यकीय मदतीसाठी अर्थसहाय्य मिळावे यासाठी २० डिसेंबर २०१० रोजी महापौर सहाय्यता निधीची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी या महापौर निधीतून अर्थसहाय्य देण्यात येत होते. प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रातील गरजूंना आर्थिक मदत दिली जात होती. परंतु महापौर निधीतून केरळातील भूकंप तसेच विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या नाम फाऊंडेशन या संस्थेला देखील भरगोस अर्थसहाय्य करण्यात आले होते. मागील पाच वर्षांत ५८६ गरजू रुग्णांना या महापौर सहाय्यता निधीचा लाभ मिळाला होता. परंतु  मागील वर्षी नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर करोनामुळे निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे नवीन कार्यकारिणी आली नाही परिणामी महापौर नसल्याने महापौर निधीचेही वाटप होऊ शकले नाही. मागील वर्षी सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी केवळ (२८ जून २०२० पर्यंत) केवळ ७ जणांना आर्थिक मदत करण्यात आली होती. त्यानंतरचे प्रस्ताव असेच पडून आहेत.

करोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे नवीन महापौर नसल्याने या निधीपासून शहरातील गरजू वंचित राहिले असल्याची खंत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. आमच्या कार्यकाळात आम्ही अनेक रुग्णांना भरगोस आर्थिक मदत मिळवून दिली होती, असे त्यांनी सांगितले.

क्रीडा शिष्यवृत्तीदेखील प्रलंबित

शहरातील गुणवंत आणि होतकरू खेळाडूंना महापालिकेतर्फे आर्थिक मदत आणि शिष्यवृत्ती दिली जात असते. मात्र मागील वर्षांपासून खेळांडूंना ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही.  सत्ता असताना लोकप्रतिनिधीमार्फत क्रीडा शिष्यवृत्ती वितरणाची प्रक्रिया पार पाडली जात होती. मात्र प्रशासनाकडे कारभार असल्याने तसेच बदल्या झाल्याने हे काम थंडावले आहे. मागील ६ वर्षांत पालिकेने ३९० खेळाडूंना १० कोटी ७९ लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.   नगरसेवकांचा कार्यकाळ पुर्ण होण्यापूर्वी सादर झालेल्या १२२ खेळाडूंनाच शिष्यवृत्ती देण्यात आली होती.

महापौर निधीला मदत बंद

शहरातील दानशूर व्यक्ती आणि संस्था महापौर निधीला अर्थसहाय्य करत असतात. ती रक्कम वैद्यकीय मदतीशिवाय इतर सामाजिक कार्यासाठी देण्यात येते. या महापौर निधीतून केरळचा भूकंप, नाम फाऊंडेशनला आर्थिक मदत कºण्यात आली होती. मात्र आता महापौरच नसल्याने महापौर सहाय्यता निधीकेड येणारी आर्थिक मदतही थांबली आहे.