News Flash

‘ड्रम सीडर’,‘एसआरटी’ पद्धतीने पेरणी

वसईतील शेतकऱ्यांचा नवनवीन पद्धतीने शेती प्रयोग करून शेती करण्याकडे कल वाढू लागला आहे.

वसई तालुक्यात शेतकऱ्यांची प्रयोगशीलतेकडे वाटचाल

वसई : वसईतील शेतकऱ्यांचा नवनवीन पद्धतीने शेती प्रयोग करून शेती करण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यातच आता वसईतील काही शेतकऱ्यांनी ‘ड्रम सीडर’ व ‘एसआरटी’ पद्धतीचा वापर करून बियाणांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अगदी कमी वेळात पेरणीचे काम होऊ लागले आहे.

वसईच्या विविध ठिकाणच्या भागात मोठय़ा प्रमाणात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. यात खरिपाची सुरुवात ही अगदी मे महिन्यापासूनच सुरू होऊन त्यात राब-राबणी, बांध बंदिस्ती, उखळणी, पेरणी, खते, औषधे फवारणी, खणणी, चिखलणी, आवणी, बेणणी, खुरपणी, कापणी, झोडणी, वाढवणी इत्यादी ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. यात मोठय़ा प्रमाणात मजुरांची गरज भासते. परंतु या पारंपरिक शेती पद्धतीला हळूहळू आधुनिकतेची जोड देऊन ‘ड्रम सीडर’ व ‘एसआरटी’ या पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत तालुका कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. यात पेरणी यंत्रात बियाणे टाकून विशिष्ट अंतराने रोलिंग करून पेरणी केली जाते. यामुळे शेती प्रक्रियेतील बहुतांश प्रक्रिया गाळल्या जातात. ‘ड्रम सीडर’ पद्धतीने केलेल्या लागवडीमुळे नांगरणीनंतर केवळ एक-दोन मजुरांच्या माध्यमातून एकदाच बियाणे पेरणी करून झाल्यावर, बेणणी, खत व औषध फवारणी यानंतर थेट कापणी, झोडणी, वाढवणी इतक्याच प्रक्रियेतून भात पीक घेता येते यामुळे राबणी, खणणी, चिखलणी, आवणी यासाठी लागणारी मजुरी व श्रम वाचतात.

कृषी विभागाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या कृषी शाळेत या लागवडीची व कमी वेळात शेती करण्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गतवर्षी प्रयोग म्हणून ‘ड्रम सीडर’ पद्धतीचा अवलंब करून शेती केली. त्यासाठी यंदाही दीड एकर शेतात ‘ड्रम सीडर’ पद्धतीने भाताची पेरणी केली असल्याचे शेतकरी रोहिदास कुडू यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 3:01 am

Web Title: sowing by drum cedar srt method farmers ssh 93
Next Stories
1 वसईत मुसळधार
2 मीरा-भाईंदर शहर जलमय
3 हजारो कुटुंबे मृत्यूच्या छायेत
Just Now!
X