सणाच्या पावित्र्याबरोबर पर्यावरणाचे संवर्धन

वसई: पालिकेने कृत्रिम तलाव तयार केले नसले तरी वसई विरार शहरातील सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रॅक्टरमध्ये मोठा िपप ठेवून हा फिरता कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे. त्यात घरगुती गणपतींचे विसर्जन केले जात आहे. तर वसईत तलावाऐवजी विहिरीत विसर्जन करण्याचा प्रयोग राबविण्यात आला आहे

गणेशोत्सव काळात तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावांची संकल्पाना पुढे आली. मात्र वसई विरार महापालिकेतर्फे आजवर कृत्रिम तलाव उभारले गेले नव्हते. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने शहरात फिरते कृत्रिम तलाव उभारले आहे. ट्रॅक्टरमध्ये पाण्याचा मोठा िपप ठेवला जातो आणि घरोघरी जाऊन मूर्त्यां गोळा करून त्याचे विधिवत विसर्जन केले जाते. मागील दोन वर्षांपासून आम्ही ही संकल्पना राबवली होती आणि त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजिव पाटील यांनी सांगितले. आम्ही गणेशोत्सवाच्या आधीपासून नागरिकांमध्ये जनजागृती केली होती. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवाची यादी आमच्याकडे आली आहे. आमचा फिरता कृत्रिम तलाव अर्थात ट्रॅक्टर विविध भागांत फिरतो आणि भाविक आपल्या घरगुती मूर्तीचे विसर्जन करत असतात. विरारच्या मनवेलपाडा परिसरात दीड दिवसांच्या ५० हून अधिक गणपतींचे विसर्जन या फिरत्या कृत्रिम तलावात झाले. गौरींचे विसर्जनही या फिरत्या कृत्रिम तलावात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही विरार पश्चिमेच्या बोळिंज परिसरात फिरते कृत्रिम तलावाची संकल्पना राबवत आहोत. या फिरत्या कृत्रिम तलावात दीड दिवसांच्या दीडशेहून अधिक गणपतींचे विसर्जन झाले, असे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी सांगितले.

वसईत विहिरीत विसर्जन

वसई पश्चिमेच्या महात्मा फुले नगरातील रहिवाशांनी तलावांऐवजी विहिरीत विसर्जनाचा प्रयोग केला. याबाबत माहिती देताना शिवछाया मित्रमंडळाचे अध्यक्ष संदेश जाधव यांनी सांगितले की, मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीला बंदी होती म्हणून आमच्या परिसरातील विहिरीत आम्ही विसर्जन केले. ही संकल्पना यावर्षीदेखील नागरिकांनी राबवली. आमच्या भागात दीड दिवसांच्या ४० हून अधिक घरगुती गणपतींचे या विहिरीत विसर्जन झाले. गौरी गणपतींचेही विसर्जन विहिरीत केले जाणार आहे. यामुळे गणेशोत्सवाचे पावित्र्य जपले जात असून पर्यावरणाचेही रक्षण होत आहे, असे जाधव यांनी सांगितले.