सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे निर्देश; बँकांबाहेर पोलीस गस्त वाढवणार

वसई : विरारमधील आयसीआयसीआय बँक लूट प्रकरणानंतर बँकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बँकांना सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर शहरातील सर्व बँकांच्या बाहेर गस्ती वाढविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

मागील गुरुवारी विरार येथील आयसीआयसीआय ही बँक लुटण्याच्या प्रयत्न झाला होता. बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे याने चाकूच्या साहाय्याने बँकेतील दोन महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला करून सव्वादोन कोटींची लूट करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात महिला व्यवस्थापक योगिता वर्तक-चौधरी यांचा मृत्यू झाला होता, तर दुसरी महिला रोखपाल श्रद्धा देवरुखकर या जखमी झाल्या होत्या. या घटनेच्या वेळी बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा समोर आला आहे. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेदरम्यान सुरक्षा रक्षक तैनात नसायचा. नेमका याच संधीचा फायदा आरोपी दुबे याने घेतला होता. एटीएम केंद्रामध्ये चोऱ्या होत असल्याने सर्व एटीएम केंद्राबाहेर सुरक्षारक्षक असणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र विरारमध्ये तर बँकेबाहेर पूर्ण वेळ सुरक्षारक्षक नसल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी बॅँकांचे सुरक्षारक्षक हे निवृत्त झालेले कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक असतात. ते सुरक्षारक्षकाचे काम करण्याऐवजी बँकेतील ग्राहकांना कार्यालयीन कामात मदत करतात. त्यामुळे   सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष देण्याचे निर्देश पोलिसांनी बॅँकांना दिले आहे. ‘बॅँकांची सुरक्षा ही अंतर्गत बाब असली तर यापुढे मोठय़ा बँकांच्या ठिकाणी पोलीस गस्ती वाढविण्यात येतील’, असे मीरा-भाईदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले. आरोपी सध्या विरार पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.   दरम्यान, यापुढे मोठय़ा बँकांच्या ठिकाणी पोलीस गस्ती वाढविण्यात येतील. ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू व रोकड वापरात येते अशा सर्व ठिकाणी खासगी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या आणि त्यांच्या बरोबरच पोलीस गस्त सतर्कतेने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे दाते यांनी सांगितले.

अनिल दुबे याच्यावर आणखी एक गुन्हा 

आरोपी दुबे नायगावच्या अ‍ॅक्सिस बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. या घटनेपूर्वी त्याने अ‍ॅक्सिस बँकेतील २६ लाख ८४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. आयसीआयसीआय बँक लुटण्याच्या एक दिवस आधी म्हणजे २८ जुलै रोजी त्याने नायगाव येथील अ‍ॅक्सिस बँकेतील २८ लाख रुपये लंपास केले होते. याबाबत बँकेने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दुबे याच्यावर फसवणूक आणि अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.