मालजीपाडा उड्डाणपुलाचे काम अपूर्ण

वसई : मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. तर दुसरीकडे मालजीपाडा उड्डाणपुलाचे अर्धवट झालेले काम व रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे वाहनचालकांना याचा मोठा फटका बसू लागला आहे.

वसई पूर्वेतील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. दररोज या महामार्गावर मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते.परंतु गुरुवारपासून मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. याचा परिणाम हा वाहतुकीवर झाला आहे. यामुळे मागील दोन दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्या पासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामुळे कामानिमित्त निघालेल्या नागरिकांचा तासन्तास खोळंबा झाला.

तसेच महामार्गावर मालजीपाडा येथे उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने रस्ता हा अरुंद झाला आहे. येथील रस्त्यावर पुलाच्या बांधकामादरम्यान खड्डे पडले होते. ते खड्डे या पावसाळ्यात अजूनच वाढले आहेत. याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अर्धवट कामामुळे अरुंद झालेला रस्ता आणि रस्त्यावरील खड्डे त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी येथे होत आहे. महामार्गावरील सेवा रस्तेही (सव्‍‌र्हिस रोड) अपूर्ण आहेत. त्यामुळे अवजड वाहने एका लेनमध्ये उभी राहतात. त्यामुळे रस्ता अरुंद होतो त्यामुळेही वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.

पावसामुळे पुलाच्या कामात अडथळे

मालजीपाडा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे आतापर्यंत  ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. असे जरी असले तरी अजूनही  खडीकरण व डांबरीकरण यासह इतर कामे बाकी आहेत. परंतु भर पावसात ही कामे ही करता येत नसल्याने अडथळे निर्माण होऊन हे कामही आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जोपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत येथील वाहतूक कोंडीची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.

महामार्गावर वाहनांच्या संख्येत भर

रेल्वेप्रवास सर्वसामान्य नागरिकांना बंद असल्याने मुंबईला जाण्यासाठी नागरिक खासगी वाहनांचा वापर करत आहे. त्यामुळे  महामार्गावरील वाहनांची संख्येत वाढ झाली आहे.  शहरातून तसेच पालघर जिल्ह्यतून मुंबईला दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि कामधंद्यानिमित्त ये—जा करत असतात. आता करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने निर्बंध शिथिल केले आहेत. पुन्हा एकदा उद्योगधंदे, शासकीय आणि खासगी कार्यालये, आस्थापना सुरू झाल्या आहेत.रेल्वेसेवा बंद असल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे महामार्गावरून खासगी गाडय़ा, एसटी बसेसने मुंबईत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.