अनिर्बंध वाहतुकीमुळे आठवडय़ाभरापासून वाहतूक कोंडी

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गावरील सिग्नल गेल्या आठ दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नियमांचे उलंघन करत अनिर्बंध वाहतूक होत असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गावर मेट्रोचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील रस्ता अरुंद झाला असून मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मुख्य मार्गावरील प्लझेन्ट पार्क, सिल्व्हर पार्क, शिवार गार्डन आणि कानकिया मार्गावरील सिग्नल बंद पडले आहेत.  अनेक दुचाकी आणि चारचाकी स्वार सिग्नल बंद असल्यामुळे वेगाने वाहन घेऊन जात असल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिग्नल समस्येमुळे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे इतर वाहतूक समस्यमांकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील सिग्नलची देखरेख व देखभाल करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

दोन दिवसांपूर्वी या सिग्नलची दुरुस्ती पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आता केवळ वाहतूक विभागाचे काम शिल्लक असल्यामुळे ते सिग्नल बंद आहेत. मात्र ते लवकरच सुरू करण्यात येतील.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग