वसई-विरारमध्ये महिनाभरात १९ दिवस लसीकरण बंद; नागरिकांची फरफट

वसई: वसई-विरार शहरातील लसीकरण अगदी धीम्यागतीने  सुरू आहे. जुलै महिन्यात वसई-विरारमध्ये पालिकेचे लसीकरण महिन्याभरातून १९ दिवस बंद ठेवण्यात आले होते. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असून अजूनही शहरातील नागरिकांना लसीकरणासाठी फरफट करावी लागत आहे.

वसई-विरारमध्ये लसीकरणाला प्रारंभ होऊन सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. असे जरी असले तरी  शहरातील लसीकरण अगदी धीम्या गतीने  सुरू आहे.  आज नाही तर उद्या लस  मिळेल या आशेवर अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर  ये-जा करीत आहेत.

लशींचा पुरेसा साठा मिळत नसल्याने मागील जुलै महिन्यातील १९  दिवस पालिकेचे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते.  त्यातही ५१ केंद्रापैकी मोजक्याच केंद्रावर लसीकरण सुरू होते. अशातही काही ठिकाणी  वशीलेबाजीचा प्रकार यामुळे  लसीकरणासाठी रांगा लावूनही अनेक जणांना लस न घेता घरी परतावे लागत होते.  ऑनलाइन व ऑफलाइनचा गोंधळ यामुळे लस मिळवण्यासाठी नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. जुलै महिन्यात पालिकेला कोविडशिल्ड ४३ हजार २१० तर कोव्हॅक्सीनच्या दोन हजार ३५०  तर गर्भवतींसाठी दोन हजार ४०० इतक्याच मात्रा उपलब्ध झाल्या आहेत.  यामुळे पालिकेच्या क्षेत्रात ३, ५, ७, १२, १४, १६, २०, २३, २६,२७, ३०, ३१ जुलै या दिवशी लसीकरण करण्यात आले तर वालीव येथील अग्रवाल केंद्रावर नाममात्र लसीकरण सुरू होते. कारण केंद्रावर दिवसाला कोव्हॅक्सीनच्या साधारणपणे ५०, १००, १५० अशा लशीच्या मात्रा दिल्या जात होत्या.

खासगी लसीकरण केंद्राचा आधार

पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लशींचा साठा उपलब्ध होत नसल्याने पालिकेला लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहे. दुसरीकडे मात्र विविध सामाजिक संस्था, रुग्णालये यांच्यामार्फत  लसीकरण सुरू आहे.   या केंद्राचा आधार आता शहरातील काही नागरिक घेऊ लागले आहेत. या लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिकांना पैसे देऊन लसीकरण करवून घ्यावे लागत आहे.