लसीकरणाबाबत पालिकेची नियमावली, खासगी केंद्रांच्या निवडीचे अधिकार प्रशासनाकडे

विरार : वसई-विरार परिसरात खासगी लसीकरण केंद्रावर मोठय़ा प्रमाणात लसीकरण सुरू आहे. शासनाच्या निश्चित दरापेक्षा अधिक दर आकारून नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केली होती. या वृत्ताची पालिकेने दखल घेतली असून शासकीय नियमानुसार लसींचे दर आकारण्याचे आदेश पालिकेने दिले असून अतिरक्त दर आकारणाऱ्या केंद्रावर कारवाई केली जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात खासगी रुग्णालयांकडून लसीकरण मोहीम राबविल्या जात आहेत. यात नागरिकांकडून १००० ते २००० च्या आसपास लसींचे दर आकारले जात आहेत. पालिकेच्या लसीकरण मोहिमेत अनेक त्रुटी असल्याने नागरिकांची लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. त्यात नोंदणी करूनही स्लॉट मिळत नसल्याने नागरिकांचा कल खासगी केंद्राकडे वाढत आहे. याचाच फायदा घेत खासगी केंद्रानी लसीकरण सुरू केले आहे. यात मुंबईतील काही खासगी संस्था वसई- विरारमधील खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम राबवीत आहेत. यात वाजवीपेक्षा अधिक दर घेऊन नागरिकांचे लसीकरण करत आहेत. याबाबत काही नागरिकांनी पालिकेत तक्रार केली होती पण पालिकेने आम्ही लसपुरवठा करत नसल्याचे सांगत याकडे कानाडोळा केला होता. यात पालिकेने अजूनही कोणत्याही खासगी केंद्राला लसीकरणाची परवानगी दिली नाही असेसुद्धा पालिकेने सांगितले.

पण आता पालिकेने खासगी लसीकरण केंद्रांना लस केवळ शासकीय दरानुसारच विकावी असे आदेश दिले आहेत. यात शासकीय नियमानुसार खासगी लसीकरण केंद्रांना कोविशिल्ड ७८० रुपये, कोवॅक्सीन १४१० रुपये, स्पुटनिक व्ही ११४५ रुपये यात ५ टक्के वस्तू सेवा कराचा आणि रुग्णालयाच्या सेवांचा दर समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता खासगी लसीकरण केंद्रांना या दरानुसारच लस विक्री करावी लागणार आहे. जी रुग्णालये अधिक दर आकारतील त्यांवर पालिकेकडून कारवाई केली जाईल अशी माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माने यांनी दिली.