निर्मिती व वापराचे दिनांक न छापणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

विरार : गणेशोत्सवाच्या काळात भेसळयुक्त व निकृष्ट साहित्याचा वापर करून मिठाया तयार करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मावा, बर्फी, पेढे, हलवा, लाडू, मोदक आणि फरसाणचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात तीन मिठाईवाल्यांवर मिठाईच्या मुदतीची दिनांक छापली नाही म्हणून कारवाई केली, तर १४ ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

वसई विरार परिसरात सणासुदीच्या दिवसात मोठय़ा प्रमाणात मिठाईमध्ये भेसळ केली जाते. गुजरात आणि राजस्थानमधून हजारो किलो बनावटी मावा या दिवसांत वसई-विरारमध्ये चोरटय़ा मार्गाने आणला जातो. त्यापासून मिठाई बनविल्या जात असल्याची अनेक उदारणे समोर आली आहेत. नालासोपारा, वसई महामार्गालगत आणि छोटय़ा मोठय़ा चाळीच्या ठिकाणी भेसळखोर आपले उद्योग चालवत आहेत.

सणांच्या दिवसात नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात मिठाईची मागणी वाढते. भेसळयुक्त पदार्थ आणि अन्नातून होणारी विषबाधा रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने खुल्या मिठाईची विक्री करताना त्यावर उत्पादन तारीख आणि ते कधीपर्यंत वापरावे याची तारीख लिहिणे बंधनकारक केले आहे. मात्र वसई विरार शहरातील मिठाई विक्रेते हा नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्यामुळे मिठाईची गुणवत्ता समजत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

असे असताना अन्न व औषध विभागाकडून आता कारवाईला सुरुवात झाली आहे. विभागाने वसई विरारमध्ये अनेक मिठाईच्या दुकानात तपासण्या केल्या असून यातील दोन दुकानातून माव्याचे नमुने, सहा दुकानातून काजू कतरीचे नमुने, १३ दुकानातून बर्फी, पेढे आणि मोदकाचे नमुने, ३ दुकानातून लाडूचे नमुने, २ दुकानातून फराळी चिवडय़ाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तर आचोळेरोड नालासोपारा येथे ‘ब्रिजवासी मावा बर्फीवाला’ या दुकानावर कारवाई करत २१ हजार २०० रुपये किमतीचा बनावटी हलवा जप्त केला आहे. मिठाईवर मुदत दिनांक न छापणाऱ्या ३ मिठाई दुकानांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दंडवसुली केली जाणार असल्याचे सहआयुक्त पी. आर. सिंगरवाड यांनी सांगितले आहे.

खुल्या मिठाईत मोठय़ा प्रमाणात भेसळ होत असल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने खुल्या मिठाईतील भेसळ रोखण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता नागरिकांना समजावी यासाठी या मिठाईवर उत्पादन दिनांक आणि त्याची मुदत याचा स्पष्ट उल्लेख केला जावा, अशी ताकीद सर्व मिठाईवाल्यांना दिली आहे. पण तरीही शहरातील शेकडो मिठाईवाले या नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. यामुळे आता अशा मिठाईवाल्यांवर सरळ कारवाई करत दंडवसुली केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले आहे.