|| कल्पेश भोईर

वारसांचा शोध लावण्याचे लोहमार्ग पोलिसांसमोर आव्हान

वसई : मागील तीन वर्षांत मीरा रोड ते वैतरणा या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे अपघातांत मरण पावलेल्यांपैकी १०८ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतरही या मृतदेहांच्या वारसांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे हे मृतदेह बेवारस राहिले आहेत. या बेवारस मृतदेहांचे नातेवाइक शोधण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांपुढे आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच वाढली आहे. वैतरणा ते मीरा रोड या दरम्यानच्या स्थानकांतूनही दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. नालासोपारा, विरार, वसई या स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढणे-उतरणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. तर काही प्रवासी लवकर पोहचण्यासाठी, जिने चढ-उतार करण्याचे टाळून रेल्वे रूळ ओलांडत असतात. तर काही प्रवासी हे लोकलच्या दरवाजाच्या कडेला उभे राहून लटकून प्रवास करतात. यामुळे अनेकदा विविध प्रकारच्या अपघातांच्या घटना घडत असतात. यामध्ये रेल्वे रूळ ओलांडणे, दरवाज्यात उभे असताना तोल जाणे, लोकलमधील गर्दीतून पडून, ओव्हरहेड तारेच्या धक्क्याने मृत्यू अशा अपघातांत प्रवाशांचा मृत्यू होतो. विचित्र स्वरूपाचे अपघात असल्याने अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींचे  चेहरे किंवा इतर अवयवांवरून ओळख पटविणे व त्याचा शोध घेणे हे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांच्या समोर असते. त्यामुळे अशा प्रकारच्या मृतदेहांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागते. 

२०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये ४१८ जणांचा रेल्वे अपघातांत मृत्यू झाला आहे. यातील ३१० मृतदेहांची ओळख पटली आहे. मात्र अजूनही १०८ मृतदेहांच्या वारसांचा शोध लागला नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. सर्व स्तरांवरील प्रयत्न करूनही यांचा शोध लागला नसल्याने हे मृतदेह अजून बेवारस आहेत.

शोध घेण्यासाठी उपाययोजना

मृतदेहांच्या वारसाचा शोध लागावा यासाठी रेल्वे पोलीस पथकाकडून विविध प्रकारच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत. मृत झालेल्या व्यक्तीची माहिती घेणे, तपास यादी विविध ठिकाणच्या स्थानकात पाठविणे, मृत झालेल्या व्यक्तींची छायाचित्रे काढून स्थानकांत, सार्वजनिक ठिकाणी फलकांवर लावणे तसेच जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्याकडे याची विचारपूस केली जात आहे. जेणेकरून त्यांची माहिती मिळू शकेल.

अशा प्रकारे लावली जाते विल्हेवाट

अपघातात मृत्यू झालेल्या बेवारस व्यक्तीचा मृतदेह हा नियमानुसार सात दिवस ठेवू शकतो. परंतु त्याच्या वारसांचा शोध लागावा यासाठी हे मृतदेह १५ ते २० दिवस शवागरात ठेवले जातात. वसई, नालासोपारा, भाईंदर अशा ठिकाणच्या भागातील शवागरात हे ठेवले जातात. या दिवसात मृतांच्या वारसांचा शोध लागला नाही तर त्यांची नियमानुसार पोलिसांच्या मार्फत विल्हेवाट लावली जात आहे. त्यानंतरही वारसांना मरण पावलेल्या व्यक्तींची ओळख पटावी यासाठी त्यांचे डीएनएही काढून ठेवले जात आहेत.

बेवारस मृतदेहांच्या वारसांचा शोध घेण्याची रेल्वे पोलिसांची मोहीम सुरूच असते. परंतु काही मृतदेहांची माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे असे मृतदेह हे बेवारस राहतात.  – सचिन इंगवले, पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस ठाणे</strong>