scorecardresearch

मदत क्रमांकावरील प्रतिसादाची वेळ दीड तासावरून पाच मिनिटांवर ; मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची हेल्पलाइन प्रभावी

संकटग्रस्तांना मदत करण्यापासून आत्महत्या करणाऱ्याचे प्राण वाचविण्यातदेखील यश आले आहे.

मदत क्रमांकावरील प्रतिसादाची वेळ दीड तासावरून पाच मिनिटांवर ; मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची हेल्पलाइन प्रभावी
(संग्रहित छायाचित्र)

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : नागरिकांच्या मदतीसाठी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची ११२ ही हेल्पलाइन सेवा सर्वात प्रभावी ठरत असून कुणीही दूरध्वनी केल्यास अवघ्या ५ मिनिटांच्या आत पोलीस हजर होऊ लागले आहेत. ही हेल्पलाइन सेवा सुरू झाल्यापासून ३२ हजारांहून अधिक दूरध्वनी आले आहेत. यामुळे संकटग्रस्तांना मदत करण्यापासून आत्महत्या करणाऱ्याचे प्राण वाचविण्यातदेखील यश आले आहे.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० रोजी झाली. शनिवार स्थापनेला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा अपुरे मनुष्यबळ, अपुरी साधनसामग्री असल्याने कुणी मदतीसाठी दूरध्वनी केल्यावर दीड तासाचा वेळ लागायचा. आता ही वेळ सरासरी ५ मिनिटांवर आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिली. या हेल्पलाइनवर आतापर्यंत ३२ हजार १८० दूरध्वनी आले होते. त्यापैकी २८ हजार ८२७ कॉल्सच्या ठिकाणी पोलीस हजर झाले आणि संबंधितांना मदत केली. अडचणीत असलेल्यांना मदत, अडकलेल्यांची सुटका तसेच आत्महत्या करणाऱ्यांना रोखणे यामुळे शक्य झाले आहे. राज्यात ११२ क्रमांकाची हेल्पलाइन सेवा सुरू करण्याचा पायलट प्रोजेक्ट मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात सुरू झाला होता. तो यशस्वी झाल्याने संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.

विशेष सॉफ्टवेअर

शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात पोलीस गस्त घालतात. ही गस्त घालण्याचे काम बीट मार्शल करत असतात. बीट मार्शल परिसरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर ते गस्त घालत असतात. नागपूर आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर एक विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. यामध्ये गस्तीवरील पोलिसांच्या मोबाइलमध्ये हे सॉफ्टवेअर असणार आहे. त्यानुसार कुठल्या भागात कुठला पोलीस गस्तीवर आहे त्याची माहिती वरिष्ठांना मिळेल. याशिवाय परिसरातील नागरिकांनादेखील त्याची माहिती एसएमएसद्वारे मिळत राहील. गस्तीवर असणाऱ्या पोलिसाचे नाव, मोबाइल क्रमांक आदींची देखील माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील त्यांच्याशी संवाद साधणे सोपे होणार आहे. या पद्धतीचा अभ्यास कऱण्यासाठी पोलिसांचे एक पथक बंगळूरु येथे रवाना करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर आम्ही ही पद्धत सुरू करत आहोत. यामुळे पोलीस आपल्या मदतीसाठी आहेत ही भावना नागरिकांच्या मनात निर्माण होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या