वसई-विरार महानगरपालिकेने आपल्या आरोग्य यंत्रणांचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. सध्या महानगरपालिका आपल्या आरोग्य सेवांचा विस्तार करत १२ नवी आरोग्य केंद्रे उभारणार आहे. याला शासनाने मान्यता दिली असून यासाठी मनुष्यबळसुद्धा शासनाकडून दिले जाणार आहे.
मागील काही वर्षांत वसई, विरार शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत असल्याने नागरिकांना आरोग्य सेवा कमी पडत आहेत. याची प्रचीती करोना काळात सर्वानाच आली. यामुळे पालिकेने करोना काळात पालिकेने चंदनसार, बोळिंज, सोपारा गावात रुग्णालये सुरू केली. यातील काही रुग्णालयाचे काम अजूनही सुरू आहे.

वसई-विरार महानगरपालिकेकडून शहरात २१ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १८ दवाखाने, २ रुग्णालये आणि ३ माता बाल संगोपन केंद्र चालवली जात आहेत. पण या यंत्रणा सध्याच्या लोकसंख्येच्या मानाने कमी आहेत. कारण दर २० हजार लोकसंख्येच्या मानाने हेल्थवेल्थ केंद्र आवश्यक आहे. तर ५० हजार लोकसंख्येच्या मानाने प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक आहे. सध्या शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या वर असल्याने आरोग्य यंत्रणांचा विस्तार करणे गरजेचे आहे. यामुळे पालिकेने हा निर्णय घेतल्याचे वैद्यकीय विभागाचे उपायुक्त विजयकुमार व्दासे यांनी सांगितले.

या संदर्भात माहिती देताना पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले १२ हेल्थवेल्थ केंद्राचा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून डॉक्टर आणि परिचारिका व इतर कर्मचारी यांनासुद्धा मान्यता दिली आहे. पालिकेकडून प्रभागनिहाय जागेची पाहणी करून त्याचे अहवाल तयार करण्यात आले आहेत.

लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. हेल्थवेल्थ केंद्रात बाह्य रुग्ण तपासणी कक्ष, साथीच्या आजाराचे सर्वेक्षण, तसेच शासनाच्या योजना आणि उपक्रम राबविले जाणार आहेत. यामुळे रुग्णांना जलद आणि मोफत उपचार मिळणार आहेत.