scorecardresearch

बस थांब्यांची दुर्दशा ; वसई, विरारमध्ये १३५ बसथांबे, मात्र देखभाल-दुरुस्ती, सुरक्षेकडे दुर्लक्ष

वसई, विरार शहरात महापालिकेने विविध ठिकाणी प्रवाशांना उभे राहण्यासाठी शहरात १३५ पेक्षा अधिक बस थांबे तयार केले आहेत.

बस थांब्यांची दुर्दशा ; वसई, विरारमध्ये १३५ बसथांबे, मात्र देखभाल-दुरुस्ती, सुरक्षेकडे दुर्लक्ष

वसई : वसई, विरार शहरात महापालिकेने विविध ठिकाणी प्रवाशांना उभे राहण्यासाठी शहरात १३५ पेक्षा अधिक बस थांबे तयार केले आहेत. परंतु त्यांची देखभाल, दुरुस्तीसह तेथील सुरक्षितता याकडे दुर्लक्ष केले असल्याने बस थांब्याची दुर्दशा होऊ लागली आहे. तर अनेक बसथांबे अतिक्रणाच्या विळख्यात सापडले आहेत.

वसई-विरार शहरात महापालिकेकडून परिवहन सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणच्या मार्गावर ही बस सेवा सुरू आहे. परिवहन सेवेच्या बस थांबण्यासाठी व प्रवाशांना उभे राहण्यासाठी पालिकेने बस थांबे तयार केले आहेत. परंतु काही ठिकाणच्या भागात या बस थांब्याची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी उभे राहण्यासही प्रवाशांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. उन्हाळा असो की पावसाळा बस वाट पाहत उभे राहण्यासाठी या बस थांब्याचा वापर ये-जा करणारे प्रवासी करीत असतात. यासाठी पालिकेने तयार केलेले बस थांबे सुस्थितीत आहेत किंवा नाही याची पालिकेकडून पाहणी होणे आवश्यक आहे, परंतु असे होत नसल्याने काही ठिकाणी शहरातील बस थांबे मोडकळीस आले आहेत.

तर काही ठिकाणी बस थांब्यावर गर्दुल्ले यांचा वावर सुरू असतो. तसेच काही ठिकाणी थेट बस थांब्याच्या समोरच वाहने उभी करणे, अतिक्रमण करणे असे विविध प्रकार समोर येऊ लागले आहेत. बस थांब्याच्या समोर व त्याठिकाणी अतिक्रमण असेल तर प्रवाशांनी बसची वाट बघत कुठे थांबायचे असा प्रश्न प्रवाशांनी केला आहे. याशिवाय बस थांब्याच्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्यही असते, अशा वेळी प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तर काही ठिकाणी विविध प्रकारच्या बेकायदा जाहिरातीसुद्धा लावल्या जात आहेत. त्यामुळे बस थांब्याची अधिकच बिकट अवस्था बनू लागली आहे. यासाठी पालिकेने शहरातील सर्व बस थांबे सुस्थितीत आहेत किंवा नाही याची पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

अतिक्रमणांचा विळखा
बस थांब्यावर झालेल्या अतिक्रमणाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसू लागला आहे. ज्या उद्देशाने हे थांबे तयार केले आहेत त्याचा काहीच उपयोग प्रवाशांना होत नाहीत. त्याउलट अडचणी अधिक येत आहेत. अनेक बस थांब्यावर अतिक्रमण होत आहे. तर काही धूम्रपानसारखे प्रकार घडत आहेत, याबाबत तक्रारीही येत आहेत. यासाठी पालिकेने शहरातील जेवढे बस थांबे आहेत त्यांची पाहणी करून अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी परिवहन समिती सभापती प्रीतेश पाटील यांनी केली आहे. याबाबत पालिकेच्या आयुक्त यांनाही पत्र दिले जाणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.