scorecardresearch

हलगर्जीचा बळी ; मुलीच्या मृत्यूचे तीव्र पडसाद, तुटलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष

तनिष्का ही आगाशी येथील जॉन तेवीसावे शाळेत दहावीत शिकत होती. तिचे वडील रिक्षाचालक असून तिला आई आणि मोठा भाऊ आहे.

हलगर्जीचा बळी ; मुलीच्या मृत्यूचे तीव्र पडसाद, तुटलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष
हावितरणाने घटनास्थळाची तपासणी केली. त्यावेळी वीजवाहक वाहिन्यांना तीन ठिकाणी तडे पडल्याचे आढळून आले.

वसई: तनिष्का कांबळे या मुलीच्या मृत्यूचे तीव्र पडसाद बुधवारी उमटले. तिचा मृत्यू महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करण्याची मागणी संतप्त रहिवाशांनी केली. मंगळवारी संध्याकाळी विरारच्या बोळींज येथे मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून विजेचा धक्का लागून तनिष्का कांबळे या १५ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला होता. या ठिकाणी असलेल्या भूमिगत वीज वाहत तारा तीन ठिकाणी तुटल्या होत्या आणि त्यामुळे पाण्यात वीज प्रवाह उतरून तिला विजेचा धक्का लागला.

तनिष्का ही आगाशी येथील जॉन तेवीसावे शाळेत दहावीत शिकत होती. तिचे वडील रिक्षाचालक असून तिला आई आणि मोठा भाऊ आहे. मंगळवारी शाळेला सुट्टी असल्याने ती केवळ क्लासला जाण्यासाठी बाहेर पडली होती.

निकृष्ट काम होत असल्याचा आरोप वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष जॉन परेरा यांनी केला. तर या वीज वाहक वाहिन्या निकृष्ट कशा? त्या खोलवर का टाकल्या नाहीत असे प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र जनता दलाचे उपाध्याक्ष मनवेल तुस्कानो यांनी केला आहे.शिवसेनेचे पंकज देशमुख, काँग्रेसचे कुलदिप वर्तक यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी तनिष्का कांबळेच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

बोिळज परिसरात महावितरणातर्फे भूमिगत वीजवाहक वाहिन्या टाकल्या आहेत. बुधवारी सकाळी महावितरणाने घटनास्थळाची तपासणी केली. त्यावेळी वीजवाहक वाहिन्यांना तीन ठिकाणी तडे पडल्याचे आढळून आले. मुळात या वीजवाहक वाहिन्या जमिनीच्या पाच मीटर खाली टाकणे आवश्यक होते. परंतु त्या केवळ अध्र्या मीटरचा टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे महावितरणाच्या  गलथान कारभारावर नागरिकांनी टीका केली आहे.या ठिकाणी    लोखंडी सळय़ा होत्या. त्यामुळे वीजवाहक वाहिन्या कापल्या गेल्या असाव्यात अशी शक्यता महावितरणाच्या बोळींज विभागाचे अभियंता योगेश पगारे यांनी दिली. महावितरणाने ठेकेदारांकडून काम करून घेण्यास सुरुवात केली आहे.

१९ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या

२००३ मध्ये विरार येथे दोन शाळकरी मुलींच्या अंगावर वीजवाहक तारा पडून त्यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारच्या तनिष्का कांबळे या मुलीच्या मृत्यूनंतर या घटनेच्या कटू आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. वीस वर्षे होऊन गेले तरी महावितरणाने आपल्या कारभारात सुधारणा न करता त्याच त्याच चुका पुन्हा केल्या जात आहेत. त्यामुळे निष्पाप शाळकरी मुलींचा बळी जात असल्याचा आरोप विरार येथील सामाजिक कार्यकर्ते विलास चोरघे यांनी केला.  दरम्यान संबंधित ठिकाणच्या वीजवाहक वाहिन्या या ६ ते ७ वर्ष जुन्या आहेत. यापूर्वी त्या कधी तुटल्या नव्हत्या. आम्ही तांत्रिक तपासणी करत असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे महावितरण (विरार) कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी यांनी सांगितले . तर घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरम्णी सध्या अपमृत्यूची नोंद केली आहे. मात्र चौकशीनंतर जो दोषी असेल त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर पाटील यांनी सांगितले आहे.

दीक्षा वाहून गेलेला नाला अनधिकृत

विरार : नालासोपारा येथील धाणीवबाग परिसरातील ज्या नाल्यातून दीक्षा यादव वाहून गेली तो नाला अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील धानीवबाग परिसरात राहणारी दिक्षा यादव ही १५ वर्षीय मुलगी मंगळवारी दुपारी घराजवळील नाल्यात पाय घसरून पडली होती. नाल्याचा प्रवाह जोरात असल्याने ती वाहून गेली. २४ तास उलटूनही ती बेपत्ता आहे.

हा नाला भूमाफियांनी मोठा करून त्याचा प्रवाह वाढवला आहे.   हा नाला या परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामाच्या सांडपाण्यासाठी वापरला जात आहे. चाळ माफियांनी या नाल्याची खोली आणि रुंदी वाढविल्याने या पाण्याचा प्रवाह वाढला. या नाल्यावर कोणतेही सुरक्षा कठडे नसल्याने दीक्षा यादवला आपला जीव गमवावा लागला आहे.

 पालिका अभियंता एकनाथ ठाकरे यांनी  या नाल्याची पाहणी करून पुढील कारवाई केली जाईल. पण नाल्याचे बांधकाम पालिकेने केले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर मागील काही वर्षांत चाळ माफियांनी या परिसरात अनेक चाळी वसविल्या आणि या नाल्याची खोली आणि रुंदी वाढविली यामुळे डोंगावरून वाहत येणारे  आणि चाळींतील पाणी  यामुळे  प्रवाह वाढला आहे, अशी  येथील  स्थानिकांनी  दिली आहे.

तर तनिष्काचा जीव वाचला असता

तनिष्का मंगळवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास आपल्या इमारतीतून कोचिंग क्लासला जाण्यासाठी खाली उतरली होती. तिचा कोचिंग क्लास रस्त्यापलीकडे असलेल्या इमारतीत होता. ती खाली उतरली तेव्हा पाऊस पडत होता. इमारतीच्या खाली पाणी साचले होते. तिने त्या पाण्यात पाय ठेवताच तिला विजेचा धक्का लागला. तिला वाचवायला जवळील किराणा दुकानदार आणि दोन मुले गेली. मात्र त्यांनादेखील विजेचा धक्का लागला. ते पाहून कुणी पुढे आले नाही. पाण्यात वीज प्रवाह असल्याचे लक्षात आले. नागरिकांनी लगेच महावितरणाला फोन केला. मात्र कुणी प्रतिसाद दिला नाही. शेवटी २० मिनिटांनी महावितरणाने वीज प्रवाह खंडित करण्यात आला असा आरोप स्थानिक रहिवाशी प्रशांत भोसले यांनी केला. जर तात्काळ महावितरणाने वीज प्रवाह खंडित केला असता तरी तिचा जीव वाचला असता असे स्थानिक रहिवाशी उज्ज्वला यांनी सांगितले.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या