वसई-महापालिकेतील सर्वाधिक कर्मचारी

वसई : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यातील लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा जणांना लाच स्वीकारताना पकडले होते. चालू वर्षातील पहिल्या १० महिन्यांत  २१ लोकसेवकांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. यात सर्वाधिक  प्रमाण वसई-विरार महापालिकेतील आहेत. मागील अडीच वर्षांत पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० सापळे रचून ३७ जणांना अटक केली आहे.

 विशेष म्हणजे करोना काळात व्यवहार ठप्प असतानाही नागरिकांची अडवणूक करून लाच मागण्यात येत होतो. २०२० मध्ये चार प्रकरणात एकूण सहा जणांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. त्यात वसई-विरार महापालिका, महावितरण आणि वनविभागाच्या प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता.  चालू वर्षात  १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर  कालावधीत २१ जणांना अटक करण्यात आली.  वसई-विरार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पाच तर तीन लिपिक अशा आठ जणांसह नगररचना विभागाचे तत्कालीन नगररचना अधिकारी, एक नगररचना लिपीक, एक अग्निशमन अधिकारी अशा ११ जणांवर कारवाई केली आहे. महावितरणच्या दोघांना आणि नऊ लाचखोर पोलिसांना पकडले आहे.  नुकताच विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह फलकाचा चांगला फायदा झाला. फलकाचे क्रमांक वाचून आलेल्या तक्रारीनंतर एका पशू संवर्धक अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली, अशी माहिती पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी केले आहे.

लाच मागितल्यास संपर्क करण्याचे आवाहन

लाचखोरीला आळा घालण्यासाठी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी विभागाचे दूरध्वनी क्रमांक सार्वजनिक ठिकाणी मोठ्या फलकांवर लावण्यात आले आहे. कोणी लाच मागितल्यास एक दूरध्वनी करा आणि लाचखोरांना मार्गी लावा असे आवाहन या फलकाद्वारे करण्यात आले आहे. तक्रारदाराने फक्त १०६४ वर संपर्क करायचा आहे किंवा ९९२३३४६८१०, ८००७२९०९४४ या क्रमांकावर आपली तक्रार दिल्यास शहानिशा करून पुढील कार्यवाही विभागाकडून करण्यात येईल. त्यांचे अधिकारी तक्रारदाराकडे जाऊन तशी खात्री करून घेणार आहेत.