विरार : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांवर बलात्कार करणाऱ्या एका भोंदू बाबाला विरार मधील अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत फसवणूक झालेल्या ४ अत्याचारित महिला पुढे आल्या आहेत. यातील दोन पीडित महिला मूकबधीर आहेत.

विरारमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला आर्थिक चणचण होती. जुलै महिन्यात तिच्या परिचयाच्या दिनेश देवरुखकर या व्यक्तीने तिला मॅथ्यू पंडियन या बाबाची माहिती दिली. हा बाबा मंत्र आणि पूजा करून आर्थिक अडचण दूर करतो, असे देवरुखकर याने पीडितेला पटवून दिले होते. त्याला बळी पडून ती तरुणी विरार येथे बाबा राहत असलेल्या एका घरात गेली. पूजेसाठी पंडियन याने तिच्याकडून १० हजार रुपये घेतले. पूजेनंतर कोटय़वधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडेल असे त्याने तिला सांगितले होते. त्यानंतर पूजेच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. असाच प्रकार त्याने पीडित महिलेच्या अन्य ३ मैत्रिणींबरोबर केला. त्यांच्याकडूनही पैसे घेतले. या प्रकरणी कुठे वाच्यता केल्यास जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन, अशी धमकीही दिली होती. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या चारही पीडित महिलांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दिनेश देवरुखकर तसेच भोंदू बाबा मॅथ्यू पंडियन याच्या विरोधात बलात्कारासह महाराष्ट्र नरबळी, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे. या बाबाने अनेक महिलांची आर्थिक व शारीरिक फसवणूक केल्याचा अंदाज आहे.