१७७ अपघातांत १९२ जण जखमी, अपघातांचे सत्र सुरूच,  खड्डे, अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मागील ७ महिन्यांत १७७ अपघांच्या घटना घडल्या असून त्यात ६२ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. या महामार्गावर पडलेले खड्डे, आणि अतिक्रमामुळे अपघातांची शक्यता असूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे.

दहिसर चेक नाका सोडल्यानंतर मुंबई अहमदाबाद महामार्गाची हद्द सुरू होते. ती गुजराथ सीमेवर पालघर जिल्ह्यातील आच्छादपर्यंत आहे. हा महामार्ग एकूण ११९ किलोमीटर लांबीचा आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महामार्गावर चालू वर्षांत जानेवारी २०२२ ते ३१ जुलै २०२२ या ७ महिन्यांच्या कालावाधीत एकू १७७ अपघात झाले. या अपघातात १९२ जणं जखमी झाले तर ६२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे हा महामार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू लागला आहे.

महामार्गावर झालेली अतिक्रमणे , सेवा रस्त्यांचा अभाव, रस्त्याच्या मध्येच उभी केली जाणारी वाहने, बंद पडलेली वाहने हटविण्यासाठी असलेल्या यंत्रणेचा अभाव, मोकाट जनावरांचा वावर, चिखल व धुळीचे साम्राज्य, अपुरे दुभाजक अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे अपघात घडत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने महामार्गावर विविध ठिकाणी मोठं मोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्डय़ामुळे अपघाताची संख्या अधिकच वाढली आहे.

खड्डयांची दुरुस्ती न झाल्याने अपघातांचे वाढते प्रमाण, खड्डय़ांच्या दुरुस्तीकडे महामार्ग प्राधिकरण आणि देखभाल दुरुस्ती साठी नेमलेल्या कंपनीच्या अनास्थेचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात खड्डय़ांचे साम्राज्य तयार झाले आहे.

चिंचोटी, बापाणे फाटा, मालजीपाडा, ससूनवघर, वसई फाटा, तुंगार फाटा, खानिवडे, फाऊंटन हॉटेल यासह विविध ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस हे खड्डे अधिकच वाढत आहेत.

कोपर उड्डाण पूल व पेल्हार  येथे सुमारे दोन ते चार फूट रुंद तर ६ इंचाहून अधिक खोलीचे खड्डे पडले आहेत. नव्याने ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

नियमावलींचे उल्लंघन

राष्ट्रीय महामार्ग असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचे अतिक्रण होऊ नये असे स्पष्ट आदेश नगर विकास खात्याने २०१९ मध्ये काढले होते. महामार्गाच्या दुतर्फा बाजूने होणाऱ्या वसाहतींमुळे वाहनांच्या वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. अशा वसाहतींमध्ये येणारी वाहने थांबल्यामुळे वाहतुकीस अडथळा येतो.  अतिक्रमण रोखण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्याभागापासून ३७ मीटर पर्यंत कोणत्या प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. तर नागरी व औद्योगिक भागात रस्त्याच्या हद्दीपासून ३ ते ६ मीटर, तर हॉटेल, मॉल, व्यापारी गोदाम, बाजारपेठा अशा अस्थापनांसाठी ४५ मीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. महामार्गालगत होणार्या बांधकामांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय महामर्गावर सुरक्षा कठडे बांधण्यात आले होते. पण विरार ते घोडबंदर या दरम्यान बेकायदेशीर हॉटेल, गोदाम, दुकान मालकांनी आपल्या सोयीसाठी हे कठडे तोडून रस्ते बनविले आहेत. यामुळे वाहनांचे अपघात वाढले आहेत. महामार्गालगतच्या या अतिक्रमणांवर आजतागायत कोणतीही कारवाई केली जात नाही.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 62 people died in accidents on mumbai ahmedabad highway in 7 months zws
First published on: 17-08-2022 at 00:15 IST