69 villages in the rural areas of vasai virar affected by severe water crisis zws 70 | Loksatta

६९ गावांचा पाणी प्रश्न कायम; जलकुंभ उभारले पण पाणीच नाही

वसई, विरारच्या ग्रामीण भागातील ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस २४ मे २००५ रोजी मान्यता मिळाली होती.

६९ गावांचा पाणी प्रश्न कायम; जलकुंभ उभारले पण पाणीच नाही
या योजनेअंतर्गत केवळ जलकुंभ बांधण्यात आले (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

वसई :  वसई, विरारच्या ग्रामीण भागातील ६९ गावांना पाणी प्रश्न चिघळला आहे. या योजनेअंतर्गत केवळ जलकुंभ बांधण्यात आले असून वितरण व्यवस्था नसल्याने अद्याप पाणी मिळालेले नाही. दरम्यान, या ६९ गावांपैकी १७ गावांना डिसेंबर २०२३ पर्यंत पाणी दिले जाणार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे.  

वसई, विरारच्या ग्रामीण भागातील ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस २४ मे २००५ रोजी मान्यता मिळाली होती. त्यामध्ये चिंचोटी, कामण, कोल्ही, मोरी, पोमण, शिल्लोत्तर, नागले, देवदळ, बापाणे , सारजा, ससूनवघर, चंद्रपाडा, आगाशी, अर्नाळा, वटार, सत्पाळे, राजोडी, नाळे, वाघोली, मदरेस, नेवाळे, निर्मळ या गावांचा या योजनेत समावेश आहे. मात्र विविध कारणांमुळे ही योजना रखडली आहे. लोकवर्गणी भरण्याच्या मुद्दय़ावरून सुरुवातीला विलंब झाला. या योजनेची १०टक्के लोकवर्गणी भरण्यास तत्कालीन ग्रामपंचायती तयार नव्हत्या. त्यामुळे सुमारे ३ वर्षे म्हणजे २००८ पर्यंत या योजनेबाबत  कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. सन २००८ मध्ये लोकहितार्थ लोकवर्गणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भरण्याचे मान्य केले. त्यानुसार २५ जानेवारी २००८ रोजी या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली. योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर योजनेचे काम जास्तीत जास्त वेगाने पूर्ण व्हावे म्हणून सर्व कामांसाठी एकच निविदा न काढता, टप्पानिहाय ४ कंत्राटदार कंपनींना कामे देण्यात आली होती.  दरम्यान, जल जीवन मिशनअंतर्गत १७ गावांसाठी अर्नाळा व १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू असून कामे प्रगतिपथावर आहे,असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता (पालघर) जी.एस. गायकवाड यांनी सांगितले आहे.

५२ गावांना चार महिन्यांनंतर पाणी

२०२० साली पालिकेने जलवाहिन्या टाकण्यासाठी १९ कोटी रुपये खर्च करून जून २०२१ पर्यंत ५२ गावांना पाणी देण्याचा निर्णय घेतला होता.  सूर्या प्रकल्पातील अतिरिक्त १०० दशलक्ष लिटर पाणी आल्यानंतर या गावांना पाणी दिले जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे पाणी येण्यासाठी आणखी ३ ते ४ महिन्यांचा विलंब लागणार आहे.  अद्यापही गावातील अंतर्गत वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झालेले नाही.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 14:40 IST
Next Story
वसई : नालासोपाऱ्यात कारखान्याला भीषण आग