शहरातील कुपोषणात वाढ ; वसई – विरारमध्ये ९३५ बालके कुपोषित

पालघर जिल्ह्यात कुपोषण नियंत्रण योजना ग्रामीण भागासह शहरी भागात राबविण्यात येत आहेत.

विरार : करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर  वसई-विरार शहर आणि ग्रामीण भागात कुपोषित बालकांच्या आकडेवारीत घट झाली होती. परंतु पुन्हा शाळा आणि अंगणवाडय़ा बंद झाल्याने बालकांच्या कुपोषणात वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांत शहरी आणि ग्रामीण भाग मिळून ९३५ बालके कुपोषित आढळली. यात १०८ बालके अतितीव्र कुपोषित गटात मोडत आहेत. तर ८२७ बालके मध्यम कुपोषित आढळली आहेत. मध्यम कुपोषित बालकांवर तातडीने उपचार केले नाहीत तर ती अतितीव्र वर्गात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरीपाठोपाठ आता वसईतही कुपोषणाचा शिरकाव होत आहे. प्रामुख्याने शहरी आणि विकसित भाग असल्याने कुपोषणाची समस्या निर्माण होणे प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. मागील जुलै ते डिसेंबर महिन्यात वसई तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या वाढताना दिसत आहे. यात पोषण आहाराची कमी असल्याने ही संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

वसईच्या महिला व बालकल्याण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वसईत तालुक्यात सध्या प्रकल्प एकमध्ये ३५० तर प्रकल्प ५७५ बालके मागील सहा महिन्यांत कुपोषित आढळून आली आहेत. जिल्हा परिषदकडून मुलांच्या सर्वागीण विकासाठी प्रकल्प १ व प्रकल्प २ अशी वर्गवारी केली आहे. यात शहरी आणि ग्रामीण भागातील अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. सध्या कुपोषित बालकांवर उपचार सुरू असून लवकरच त्यांच्या शारीरिक क्षमतेत सुधार होईल अशी आशा प्रकल्प अधिकारी यांनी केली आहे.

कुपोषणवाढीचे प्रमुख कारण म्हणजे वसईत मोठय़ा प्रमाणात परराज्यातून स्थलांतरण होत आहे हे स्थलांतरण मुख्यत: गरीब वस्त्या, झोपडपट्टी विभागात होते. यामुळे या मुलांची संख्यासुद्धा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अंगणवाडी सेविकांपासून अशा मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी गरम ताजा आहार, जीवनसत्त्वाचे औषध, धान्य दिले जात आहे. तसेच या मुलांची नियमित तपासणीसुद्धा सुरू आहे. यामुळे लवकरच कुपोषणाला आळा घातला जाईल असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.

कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र

पालघर जिल्ह्यात कुपोषण नियंत्रण योजना ग्रामीण भागासह शहरी भागात राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना आठवडयमतून पाच दिवस अंडी वा केळी याचा आहार जिल्हा नियोजन निधीतून देण्यात येत असून त्यापैकी एका दिवसाचा आहाराचा खर्च जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्यात येतो. राज्यातील इतर भागात फक्त तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र (व्हीसीडीसी) राबविण्यात येते. मात्र पालघर जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांसह मध्यम कुपोषित बालकांना या ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये सहभागी करून घेण्याची विशेष अनुमती घेतल्यामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण नियंत्रित केले जाईल. अशी माहिती वसई प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शहरातील कुपोषित बालके

            प्रकल्प १                            प्रकल्प २

महिने  तीव्र कुपोषित    मध्यम कुपोषित  तीव्र कुपोषित   मध्यम कुपोषित

जुलै      ८            २७                   १०            ६८

ऑगस्ट   १०           ६९                   ९             १०६

सप्टेंबर   ९            ५३                   ६             ९१

ऑक्टोबर  ९           ५७                   १३            ८९

नोव्हेंबर    ६           ५३                   ९             ८१

डिसेंबर    ८           ५१                   ११            ८२

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 935 children malnourished in vasai virar zws

Next Story
व्हॉट्सअ‍ॅपवर पोलीस आयुक्तांना भेटण्याची संधी ; पोलीस आयुक्तालयात ‘ई व्हिजिट’ सेवा सुरू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी