97 employees Vasai Railway Police Station burden seven stations sanctioned posts 60 to 65 seats are still vacant ysh 95 | Loksatta

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या ९७ कर्मचाऱ्यांवर सात स्थानकांचा भार; मंजूर पदापैकी अजूनही ६० ते ६५ जागा रिक्त

रेल्वे स्थानकातील गुन्हेगारी, सुरक्षा, अपघात, गस्त अशा बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या ९७ कर्मचाऱ्यांवर सात स्थानकांचा भार; मंजूर पदापैकी अजूनही ६० ते ६५ जागा रिक्त

वसई : रेल्वे स्थानकातील गुन्हेगारी, सुरक्षा, अपघात, गस्त अशा बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वसई रेल्वे पोलीस ठाण्याचा भार केवळ ९७ पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. सात रेल्वे स्थानकांमधील सुरक्षा अबाधित राखण्यात पोलिसांचे हाल होत आहेत. मंजूर पदापैकी अजूनही ६० ते ६५ जागा रिक्त आहेत.

वसई-विरार व मीरा-भाईंदर शहर हे झपाटय़ाने विकसित होत असून या भागातील नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे रेल्वे लोकलमधून प्रवाशांची संख्या बेसुमार झाली आहे. मीरारोड ते वैतरणा अशी वसई रेल्वे पोलिसांची ३१ किलोमीटरची हद्द आहे. यात सात स्थानकांचा समावेश आहे. त्यांचा सर्व कारभार हा वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चालतो. यातच विरार, वसई, नालासोपारा, भाईंदर, मीरारोड ही अधिकच वर्दळीची ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र सद्य:स्थितीत आहेत त्या मनुष्यबळातच पोलिसांना सर्व कामे पार पाडावी लागत आहे.

गुन्हे रोखण्याचे आव्हान

रेल्वे स्थानकातील वाढत्या गर्दीमुळे सोनसाखळी चोरी, पाकीट मारी, बॅग लिफ्टिंग, मोबाइल चोरी, मारामारीच्या घटना, छेडछाडीचे प्रकार अशा विविध प्रकारचे गुन्हे घडतात. मागील दहा महिन्यांत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८७४ इतके गुन्हे घडले आहेत. या गुन्ह्यांना रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांच्या समोर आहे. त्यातच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वे पोलिसांवरच आहे.  पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अडचणी येत असतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलीस कर्मचारी  

पदे     मंजूर   कार्यरत  रिक्त

वरिष्ठ पोलीस निरीक्षक   १   १   –

पोलीस निरीक्षक            १   १   –

सहा. पोलिस निरीक्षक    २   १   १

पो. उप निरीक्षक           ४   ३   १

इतर पोलीस अधिकारी

कर्मचारी १५३ ९१  ६२

एकूण   १६१ ९७  ६४

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 00:02 IST
Next Story
भाईंदर खाडी पूल २२ वर्षांपासून अपूर्ण; मिठागर आणि वन विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा