वसई: वसईच्या उमेळा फाटा येथे खेळताना नाल्यात पडून अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. नेहाल नरेंद्र गोरवले असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वसई पश्चिमेच्या उमेळा फाटा येथील बाबू गोवारी चाळ खैरपाडा येथे नेहाल हा आपल्या आई वडिलांच्या सोबत राहत होता. पावसाळा तोंडावर असल्याने घरात डागडुजी करण्याचे काम सुरू होते. दुपारच्या वेळी घरचे सर्व जेवणकरून बसले होते. याच दरम्यान नेहाल हा त्यांची नजर चुकवून घराच्या बाहेर खेळण्यासाठी गेला होता. त्याच वेळी खेळताना तो घराच्या बाजूच्या नाल्यात पडला होता.घरच्यांनी त्याची शोध शोध सुरू केली असता हा मुलगा नाल्यात पडून मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती वसई पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच अपघाती मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी सांगितले आहे. घराच्या बाहेर मुलांना खेळण्यासाठी सोडताना पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A child died after falling into a drain in vasai amy