पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग

वसई-विरार महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे.

त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा आराखडा बनविण्यास सुरुवात

वसई : वसई-विरार महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने एक प्रभागाऐवजी त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने पालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. यापूर्वी महापालिकेत ११५ नगरसेवक होते. मात्र त्रिसदस्यीय प्रभागरचनेमुळे नगरसेवकांच्या संख्येत ११ ने वाढून १२६  होणार आहे. या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

वसई-विरार महापालिकेच्या सदस्यांचा कार्यकाळ जुलै २०२० मध्ये संपला होता. मात्र करोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. करोनाची लाट ओसरल्यानंतर नव्याने प्रभाग रचना तयार करून आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यावर हरकती आणि सूचनादेखील मागविण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा करोनाची दुसरी लाट आली आणि निवडणुकीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. आता दुसरी लाट ओसरू लागल्याने नव्याने निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

राज्य शासनाने त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने प्रभागांची संख्या ४२ होणार असून नगरसेवकांच्या संख्येत ११ ने वाढ होणार आहे. ही त्रिस्तरीय प्रभाग रचना लागू झाल्यास पालिकेतील सदस्यांची संख्या ही १२६ एवढी होणार आहे. यासाठी प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. आराखडा पूर्ण करण्याचे काम पूर्ण न झाल्याने त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेपर्यंत हा कच्चा आराखडा तयार केला जाणार आहे.

निवडणूक प्रक्रिया लांबणीवर?

प्रभाग रचनेचा आराखडा तयार झाल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहे आणि त्यानंतर आरक्षणे जाहीर करण्यात येतील. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि दीर्घकाळ चालणारी आहे. याशिवाय २९ गावांचा प्रश्न अंतिम सुनावणीसाठी उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावरही अनिश्चिततेचे सावट आहे. मात्र पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई आणि ठाणे महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या बरोबरीने वसई-विरार महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येऊ  शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accelerate election process municipality ysh

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या