वसई-विरार महापालिकेच्या लसीकरणाला वेग

वसई : वाढत्या करोनाला नियंत्रित करण्यासाठी व करोनावरील प्रतिबंधक उपाय म्हणून पालिकेने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे.  वसई-विरारमध्ये पालिकेने १३१ दिवसांत दीड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे काम पूर्ण केले आहे.

वसई-विरार पालिकेच्या क्षेत्रात १६ जानेवारीपासून  लसीकरण करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार पालिकेने विविध ठिकाणची आरोग्य केंद्रे, रुग्णालये येथे लसीकरण केंद्र उभारून लसीकरण केले जात आहे.  यात आरोग्य कर्मचारी,  फ्रंटलाइन वर्कर, ६० वर्षांवरील व्यक्ती, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील व्यक्ती, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती आदींचे लसीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत पालिकेच्या क्षेत्रात एक लाख ५० हजार २१५ लशींची मात्रा देण्यात आल्या आहेत. यातील १ लाख १६ हजार ७३७ जणांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ३३ हजार ४७८ जणांनी दुसरी मात्रा घेतली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. यात आतापर्यंत ६० वर्षांवरील सर्वाधिक म्हणजेच पहिली मात्रा ४७ हजार १२९  तर १४ हजार ५०७ जणांना दुसरी मात्रा देण्यात आलाीआहे. पालिकेने हळूहळू लसीकरण करण्याचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी आता फिरत्या व्हॅनद्वारेसुद्धा लसीकरण करण्यात येत आहे.

असे जरी असले तरी दुसरीकडे मात्र लसीकरणाचा दुसऱ्या मात्रेचा कालावधी  वाढविण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लशीचा दुसरी मात्रा  हा ४५ दिवसांऐवजी ८४ दिवसांनंतर करण्यात आला आहे. काहींना दिवसांचा कालावधी वाढल्याची कल्पना नसल्याने काही नागरिक ४५ दिवस पूर्ण झाल्यानंतर केंद्रावर दुसऱ्या मात्रेसाठी येत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत आहे.

आता दररोज पालिकेकडून कोणकोणत्या भागात लसीकरण होईल याची माहिती दिली जाते. त्यामध्ये सर्वाधिक दुसऱ्या मात्रेसाठी प्राधान्य दिले जाते. आता दुसऱ्या मात्रेसाठीचा कालावधी वाढल्याने दुसऱ्या मात्रा घेण्यासाठी जाणार तरी  कसे असा प्रश्न निर्माण होऊ लागला. यासाठी पहिला व दुसरा अशा दोन्ही लशींच्या मात्रेला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

पहिली मात्रा मिळण्यासही अडचणी

वसई-विरार महापालिकेकडून मागील काही दिवसांपासून लसीची केवळ दुसरी मात्रा उपलब्ध करून दिली जाऊ लागली आहे. त्यामुळे ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना पहिली मात्रा मिळणे कठीण झाले आहे. कारण काही नागरिकांना गंभीर स्वरूपाचे आजार असल्याने काहीजण पुढे येत नव्हते परंतु आता डॉक्टरच्या सल्लय़ाने ते सुद्धा मात्रा घेण्यास येत आहेत. मात्र पहिली मात्रा मिळत नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. माझी सासू ६९ वर्षांंची आहे त्यांचे लसीकरण करावयाचे आहे. परंतु दहा ते १२ दिवसापासून ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिली मात्रा उपलब्ध होत नसल्याचे गोपाळ अडके यांनी सांगितले आहे.ऑनलाइन नोंदणीमध्ये सुद्धा प्रयत्न करतोय परंतु त्यातही केवळ दुसऱ्या मात्रेच्या संदर्भातच सांगितले जात आहे. यामुळे अनेकांना अशा अडचणी येत असल्याने पालिकेने याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

वसई ग्रामीणमध्येही १९ हजार जणांचे लसीकरण

वसईच्या  शहरी भागाप्रमाणेच ग्रामीणमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे ग्रामीणमध्येही लसीकरण करण्यावर भर दिला असून आतापर्यंत १९ हजार ३१६  नागरिकांचे लसीकरण करून झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ग्रामीण भागासाठी  विरार ग्रामीण रुग्णालय, व आगाशी, निर्मळ, कामण, भाताने, नवघर,  पारोळ या प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण केंद्र सुरू आहे. ग्रामीणमध्ये सुरुवातीला लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच नागरिक लसीकरण करवून घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर येत आहेत. परंतु कधी कधी लशींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण करण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. सद्य:स्थितीत १६ हजार ३६१ जणांनी लशीचा पहिली मात्रा घेतली आहे. तर २ हजार ९५५ जणांनी दुसरी मात्रा घेतली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.