पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन पूल खुला होणार

कल्पेश भोईर

वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भाईंदर खाडीवर तयार करण्यात येणाऱ्या नवीन वर्सोवा पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत हा पूल तयार करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग   हा मुंबई, ठाणे, वसईला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. दररोज या महामार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या महामार्गावरील जुन्या वर्सोवा पुलाच्या शेजारीच नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहे. या कामाची सुरुवात २०१८ मध्ये करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते; परंतु करोनाच्या संकटामुळे या पुलाच्या कामाला खीळ बसली होती. करोनाचा प्रादुर्भाव ओसरताच या पूल बांधणीच्या कामाला गती मिळाली आहे. सध्या भाईंदर खाडीवर असलेल्या जुन्या वर्सोवा पुलावरूनच वाहनांची ये-जा सुरू आहे. वाढत्या नागरीकरणामुळे दिवसेंदिवस या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे सातत्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाच्या कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या महामार्गावर निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडीची समस्या व पुलाचे सुरू असलेले काम यांची माहिती घेण्यासाठी पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी शनिवारी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व वाहतूक विभागाचे अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष पुलावर जाऊन याचा आढावा घेतला. या वेळी नवीन वर्सोवा पुलाचे काम येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी दिली. हा पूल खुला झाल्यास मुंबई, ठाणे येथून जी पालघर-वसईच्या दिशेने येणारी वाहने आहेत ती थेट नवीन पुलावरून जातील. यामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल.

परिसरातील गाव-पाडय़ांनाही दिलासा मिळणार

महामार्गावर निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे  महामार्गालगतच्या अनेक गावांना त्याचा मोठा फटका बसतो. महामार्गालगत ससूनवघर, मालजीपाडा, ससूपाडा, बोबतपाडा, पठारपाडा यासह अनेक खेडीपाडी यांना अडचणी निर्माण होत असून येथे राहत असलेल्या नागरिकांच्या दळणवळणावर याचा मोठा परिणाम होत असतो. नवीन पूल खुला झाला तर सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन वर्सोवा पुलाच्या कामाचा आढावा घेतला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत हा पूल खुला होईल असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

– राजेंद्र गावित, खासदार