वसई: मागील दोन वर्षांच्या करोनाच्या संकटांनंतर यंदाचा गोपाळकाला उत्सव ही मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. मात्र या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांची जोखीम व धोका लक्षात घेऊन वसई विरार महापालिकेने गोविंदा पथकांना मोफत विमा योजना सुरू केली आहे. अवघ्या काही दिवसांवर गोपाळकाल्याचा सण आला आहे. त्यामुळे वसई विरार शहरातील गोविंदा पथकांनी सराव ही करण्यास सुरुवात केली आहे. वसई विरार शहरात विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांचे पुढारी यांच्यामार्फत मोठमोठय़ा दहीहंडय़ा लावल्या जातात. या हंडय़ा फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चढाओढ लागते.

 मात्र या दरम्यान अनेकदा अपघाताच्या घटना ही घडतात. अशा वेळी सर्वसामान्य कुटुंबातील गोविंदांना रुग्णालयाचा खर्च करणे परवडत नाही. अशा वेळी असंख्य अडचणी येत असतात. याच बाबी विचारात घेत वसई विरार महापालिकेने सन २०१५ पासून गोपाळकाळाच्या  दरम्यान गोविंदासाठी मोफत अपघात विमा योजना सुरू केली आहे. मागील दोन वर्षे करोनाचे संकट असल्याने सण उत्सव साजरे झाले नव्हते त्यामुळे या काळात ही योजना बंद होती. मात्र यंदाच्या वर्षीचा दहीहंडी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे.त्याची लगबग ही शहरात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गोविंदासाठी अपघात विमा योजना ही महापालिकेने सुरू केली आहे. या विमा योजनेत नोंदणीकृत गोविंदा पथकांना अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करताना गोविंदा पथकात सहभागी असलेल्या प्रत्येक गोविंदाचे आधारकार्ड व संपर्क क्रमांक द्यावा लागणार आहे. १६ ऑगस्टपर्यंत गोविंदा पथकांना या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहेत. विमा कंपनीमार्फत विमा उतरवून झाल्यानंतर कोणकोणत्या रुग्णालयात उपचार केले जातील याची यादीही दिली जाणार आहे.

महानगरपालिका हद्दीतील गोविंदा पथकाने पालिकेशी संपर्क साधून पथकात समाविष्ट गोविंदांचा विमा काढावा असे आवाहन पालिकेने केले आहे. ज्या दिवशी विम्याची नोंद होईल त्या दिवसांपासून ते २० ऑगस्टच्या पहाटे ६ पर्यंत विम्याचे संरक्षण गोविंदांना मिळणार अशी माहिती पालिकेने दिली आहे. याआधीच्या वर्षी ७७ गोविंदा पथकाच्या ४ हजार ६२७ गोविंदांचा विमा उतरविण्यात आला होता.

अपघातग्रस्तांना विम्याची मदत

दहीहंडी फोडण्यासाठी व सलामी देण्यासाठी गोविंदा पथकाकडून थरांवर थर उभे केले जातात अशा वेळी अपघात घडतात.  अपघाती मृत्यू झाल्यास  कुटुंबाला १० लाखांची मदत, एक हात, पाय, डोळा निकामी झाल्यास ५ लाख , दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख, तसेच अपघातामुळे रुग्णालयात होणारा १ लाखापर्यंतचा खर्च विमा कंपनी यांच्या मार्फत दिला जाणार आहे. तसेच इतर किरकोळ जखमी असतील त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत अशी माहिती पालिकेने दिली आहे.

दहीहंडी उत्सवात गोविंदा पथके मनोरे रचताना अपघात घडतात. अशा वेळी उपचारासाठी गोविंदांना अडचणी येतात. याच अनुषंगाने पालिकेने मोफत योजना सुरू केली आहे. गोपाळकाल्याच्या  कालावधीपर्यंत ही योजना लागू असणार आहे. अधिकाधिक गोविंदांनी विमा सुरक्षा कवचाचा लाभ घ्यावा.  

– शंकर खंदारे, उपआयुक्त, क्रीडा विभाग, वसई-विरार शहर महानगरपालिका.