धोकादायक दुभाजकांमुळे अपघाताचा धोका

वसई पूर्वेतून गेलेल्या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मुंबई-गुजरात यासह विविध ठिकाणच्या भागातील नागरिक येथून प्रवास करीत असतात.

अपघात रोखण्यासाठी दुभाजक बंद करण्याची महामार्ग वाहतूक विभागाची मागणी

वसई: वसई पूर्वेतील भागात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लोढा धाम व किनारा हॉटेल जवळ देण्यात आलेले दुभाजक मागील काही वर्षांपासून धोकादायक ठरू लागले आहेत. या दुभाजकांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याने हे दुभाजक बंद करण्यात यावेत, अशी मागणी महामार्ग वाहतूक पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

वसई पूर्वेतून गेलेल्या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मुंबई-गुजरात यासह विविध ठिकाणच्या भागातील नागरिक येथून प्रवास करीत असतात. मात्र या महामार्गावर दिवसेंदिवस विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्याने याचा त्रास वाहनचालकांबरोबरच महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. या महामार्गाच्या भागात प्राधिकरणाने ठिकठिकाणी दुभाजक तयार केले आले आहेत, परंतु त्यातील काही ठिकाणचे दुभाजक काही गरज नसताना जवळजवळच्या अंतरावर दिले आहेत. यामुळे अपघात होण्याचा धोका अधिकच वाढला आहे.

विशेष करून मालजीपाडाजवळील लोढाधाम व ससूनवघर येथील किनारा हॉटेल या ठिकाणी देण्यात आलेले दुभाजक हे अत्यंत धोकादायक ठरू लागले आहेत. आजूबाजूच्या भागातील माती भराव, मिक्सर व इतर अवजड वाहने येथून थेट वळण घेत असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. नुकताच काही दिवसांपूर्वी लोढा येथील दुभाजकाजवळ आरएमसी मिक्सर आणि कंटेनर याचा अपघात होऊन वाहनचालक याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशा प्रकारच्या अपघाताच्या घटनांना पायबंद लागावा यासाठी महामार्ग प्राधिकरणाने या धोकादायक असलेल्या दुभाजकाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नसल्यामुळे दिवसेंदिवस महामार्गावरील समस्यांमध्ये भर पडू लागली आहे.

दुभाजकांमुळे अनेक वाहनचालक लवकर पोहचण्यासाठी महामार्गाच्या विरुद्ध दिशेनेदेखील वाहने चालवतात, यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांनादेखील अनेक अडचणी निर्माण होत असतात. अशा कारणांमुळे वाहनांची धडक होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी हे दुभाजक बंद होणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना पत्रव्यवहार करून हे दोन्ही दुभाजक बंद करण्याची मागणी महामार्ग वाहतूक विभागाने केली आहे.

महामार्गावर लोढाधामजवळ व किनारा हॉटेल येथील धोकादायक दुभाजकांच्या धोकादायक वळणामुळे अपघात घडतात. याचा मोठा फटका वाहनचालकांना बसतो हे प्रमाण कमी करण्यासाठी धोकादायक दुभाजक बंद करण्यात यावे याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या सोबत पत्रव्यवहार केला आहे.

– विठ्ठल चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक चिंचोटी विभाग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Accident risk dangerous dividers ssh

ताज्या बातम्या