वसई:- वसई-विरार महापालिकेच्या प्रस्तावित आचोळे रुग्णालयाची जागा सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे कचराभूमी बनली आहे. रुग्णालयाच्या नियोजित जागेला साधे संरक्षण कुंपणही नसल्याने या मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात टाकाऊ साहित्य व कचरा टाकला जात आहे. वसई-विरार शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार्या या रुग्णालयाची जागाच कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वसई-विरारमध्ये सर्वसोयींनी युक्त शासकीय रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना महागड्या खासगी रुग्णालयांचा किंवा ठाणे-मुंबईतील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी पालिकेने प्रभाग समिती ‘ड’ मधील आचोळे येथील आरक्षण क्रमांक ४५५ आणि सर्वे नंबर ६ येथील दोन एकर जागेवर चारशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर ८ जुलै २०२४ रोजी नगरविकास विभागाने या प्रकल्पासह मूलभूत सुविधांसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला .ज्यातील २५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा पालिकेला मिळाला आहे. मात्र, निधी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
संरक्षण भिंत किंवा जाळी नसल्याने आजूबाजूच्या भागातून प्लास्टिक आणि कचऱ्याने भरलेल्या गोणी येथे टाकल्या जात आहेत. यामुळे जागेला कचराभूमीचे स्वरूप आले असून, भविष्यात येथे अनधिकृत अतिक्रमण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी नागरिकांचे आरोग्य सुधारणारे रुग्णालय होणार आहे, ती जागाच सद्यस्थितीत आजारी पडली आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्ते राहुल सिंह यांनी केली आहे. महापालिकेने त्वरित या जागेची स्वच्छता करून माहिती फलक लावावा आणि तात्काळ संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या जागेची मोजणी प्रक्रिया पार पडली असून जागेचे डीमार्केशन पूर्ण झाले आहे. त्याठिकाणचा कचरा हटवून त्या ठिकाणी सूचना फलक, माहिती फलक लावले जातील असे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात
आचोळे रुग्णालय उभारणीच्या कामासाठी आतापर्यंत तीन ते चार वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. आता रुग्णालय आराखडा व त्याची निविदा प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात असून त्याची छाननी सुरू आहे. त्यानंतर लवकरच रुग्णालय उभारणीच्या कामाचे कार्यादेश दिले जातील असे प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले आहे.
भूमिपूजना नंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात नाही
मागील पाच वर्षांपासून विविध राजकीय पक्ष यांच्या मार्फत रुग्णालय उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन वेळा रुग्णालयाच्या जागेचे भूमिपूजन पार पडले आहे. १९ ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याला तीन वर्षे उलटून गेल्यानंतर १० जुलै २०२४ रोजी पुन्हा एकदा भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्याच दिवशी बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन आमदार क्षितीज ठाकूर यांनी सुध्दा भूमिपूजन केले होते.
