वसई: मागील अनेक वर्षांपासून रखडलेले ४०० खाटांचे आचोळे रुग्णालय उभारण्यासाठी डिसेंबरमध्ये काढण्यात आलेल्या निविदेला मुदत वाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता या कामासाठी पालिकेकडून दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आहे.

वसई विरार शहरातील नागरिकांना गंभीर आजारावरील उपचार तातडीने मिळावेत यासाठी शहरात सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नसल्याने अडचणी येत आहेत. अशा वेळी येथील नागरिकांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. याशिवाय ठाणे, मुंबई अशा ठिकाणी धाव घ्यावी लागते. त्यामुळे वसई विरार शहरात एक तरी सर्वाधिक खाटांची क्षमता व सुसज्ज अशा सोयीसुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक सातत्याने करीत होते.

वसई विरार महापालिकेने प्रभाग समिती ‘ड’ मधील आचोळे येथील आरक्षण क्रमांक ४५५ व सर्वे नंबर ६ येथील दोन एकर जागेत ४०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. ८ जुलै २०२४ रोजी नगरविकास विभागाने रुग्णालयासाठी २५० कोटी रुपये निधी मंजूर केला आणि पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयाचे काम मार्गी लागेल असे वाटले होते. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे रुग्णालयाचे काम पुढे सरकले नव्हते. जागेचा प्रश्न व अन्य अडचणी यामुळे रखडले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्यानंतर या रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला होता.

प्रश्न मार्गी लागल्यानंतर महापालिकेने रुग्णालयाच्या बांधकामाचा आराखडा तयार करून त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी १२ डिसेंबर २०२५ मध्ये पहिली निविदा काढली होती. पण, या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने ९ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. मुदत वाढ देऊनही
प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर यासाठी दुसऱ्यांदा निविदा काढण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम अशा पद्धतीने रुग्णालयाचे काम करण्यासाठी कंत्राटदारांकडून मुद्रांकित प्रस्ताव (निविदा) मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावेळी तरी सदर कामासाठी प्रतिसाद मिळतो की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.